लांजा : तालुक्यातील पंचायत समिती गणांच्या आगामी निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत सोमवारी (१३ ऑक्टोबर) लांजा तहसील कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. एकूण आठ गणांपैकी दोन जागा सर्वसाधारण स्त्रिया, एक जागा अनुसूचित जाती स्त्री, एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग, एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, तर तीन जागा सर्वसाधारण अशा प्रकारे आरक्षण निश्चित झाले आहे.
लांजा नगरपंचायत निवडणुकीतील महिलांसाठी असलेल्या आरक्षणानंतर, पंचायत समिती गणातही महिलाराज येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तहसील कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या सोडतीत जिल्हा परिषद शाळा लांजा क्र.५ मधील इयत्ता पाचवीतील कु. प्रणित महेश लिंगायत याच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) हर्षलता गेडाम, तहसीलदार प्रियांका ढोले, निवासी नायब तहसीलदार अनिल गोसावी, महसूल नायब तहसीलदार सुरेंद्र भोजे आदी अधिकारी उपस्थित होते.
▪️ पंचायत समिती गणनिहाय आरक्षण:
९३. आसगे – सर्वसाधारण (स्त्री)
९४. वेरवली खुर्द – अनुसूचित जाती (स्त्री)
९५. प्रभानवल्ली – सर्वसाधारण
९६. भांबेड – सर्वसाधारण
९७. वाकेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)
९८. साटवली – सर्वसाधारण
९९. गवाणे – सर्वसाधारण (स्त्री)
१००. खानवली – नागरिकांचा मागास प्रवर्ग
▪️ जिल्हा परिषद गटनिहाय आरक्षण:
४७. आसगे – सर्वसाधारण (स्त्री)
४८. भांबेड – सर्वसाधारण (स्त्री)
४९. साटवली – सर्वसाधारण (स्त्री)
५०. गवाणे – सर्वसाधारण
या सोडतीला तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेना (शिंदे गट), भाजप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), आरपीआय, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांतील इच्छुकांनी उपस्थिती लावली होती.
मात्र आरक्षण सोडतीने काही राजकीय मंडळींचा हिरमोड झाला. पंचायत समितीचे माजी उपसभापती अनिल कसबले, माजी सभापती संजय नवाथे आणि काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष नुरुद्दिन सय्यद यांचे पत्ते कट झाल्याने त्यांच्या पदरी निराशा आली आहे. तर माजी सभापती दिपाली दळवी, मानसी आंबेकर, युवराज हांदे आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेश खामकर यांच्यासाठी ही सोडत फायद्याची ठरली आहे.
या आरक्षण सोडतीने लांजा तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत दिले असून, आगामी पंचायत समिती निवडणुकीचे वातावरण आता आणखी रंगतदार झाले आहे.
लांजा : पंचायत समिती निवडणुकीच्या आरक्षण सोडतीत महिलाराज!
