लांजा पोलीस ठाण्याच्यावतीने आयोजन
लांजा : येथील पोलीस ठाणेच्यावतीने शहरातील संकल्प सिद्धी सभागृहात ज्येष्ठ नागरिक आणि लांजा पोलीस यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत ज्येष्ठ नागरिकांच्या विविध अडचणी संदर्भात चर्चा करत मार्गदर्शन करण्यात आले.
ज्येष्ठ नागरिक यांच्या अडीअडचणी बाबत विचारपूस करण्याकरिता लांजा पोलीस ठाणेच्यावतीने गुरुवार १० जुलै रोजी सकाळी ११ ते १२.३० यावेळेत लांजा शहरातील साटवली रोड येथील संकल्प सिद्धी सभागृह येथे बैठक पार पडली. यावेळी ज्येष्ठ नागरिक टोल फ्री क्रमांक ११२ व पोलीस ठाणेतील दूरध्वनी क्रमांक तसेच नवीन ज्येष्ठ नागरिक मोबाईल क्रमांक याबाबत माहिती देण्यात आली.
त्याचप्रमाणे जेष्ठ नागरिक लांजा तालुका यांचा व्हाट्सअप ग्रुप तयार करून ग्रुपमध्ये ॲक्टिव्ह राहत गावातील कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने काही घटना घडल्यास त्वरित ग्रुप वर अथवा दिलेल्या संपर्क क्रमांकावर कळविण्याबाबत आवाहन करण्यात आले. तसेच सायबर गुन्हेगारी, आर्थिक गुन्हे व ज्येष्ठ नागरिक कायदा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
दरम्यान, यावेळी पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकन्या मैंदाड यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले. सदर बैठकीत तालुक्यातील ६८ ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते
लांजात ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी संदर्भात बैठक
