GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग: पनवेलमध्ये पत्रकाराचे भरदिवसा अपहरण, मुंबई-गोवा महामार्गावरून मंडणगडच्या दिशेने पळवले!

पनवेल : शहरातून दिवसाढवळ्या एका धक्कादायक घटनेने पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. गुरुवारी सकाळी पनवेल एसटी स्टँडवरून पत्रकार समीर बामुगडे यांचे दहा ते बारा जणांच्या टोळक्याने भरदिवसा अपहरण केले. त्यांना बळजबरीने गाडीत कोंबून मुंबई-गोवा महामार्गावरून थेट रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथे नेण्यात आले. सुदैवाने, या थरारक प्रसंगातून बामुगडे सुखरूप सुटले असून, त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार समीर बामुगडे हे रोहा-पनवेल बसने काही कामानिमित्त पनवेलला आले होते. सकाळी ७:१५ च्या सुमारास त्यांची बस पनवेल आगारात दत्त मंदिराजवळ थांबली असता, आधीच दबा धरून बसलेल्या दहा-बारा लोकांनी त्यांना घेरले. बामुगडे यांनी ज्येष्ठ पत्रकार आणि पत्रकार संघटनेचे राज्य प्रतिनिधी किरण बाथम यांना आपण पनवेलला पोहोचत असल्याची कल्पना दिली होती.
याबाबत बोलताना बामुगडे यांनी सांगितले की, “त्यांनी माझा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि मला त्यांच्या गाडीत कोंबले.” अपहरणकर्त्यांनी त्यांना मुंबई-गोवा मार्गाने नेले. वाटेत अरविंद काते नावाच्या व्यक्तीने त्यांना बेदम मारहाण केली आणि अत्यंत अश्लील शिवीगाळ केली, असे बामुगडे यांनी नमूद केले.

मंडणगड येथे त्यांना एका भीमाई मठात नेण्यात आले. तिथे काही लोकांना बोलावून त्यांच्या बोलण्याचे रेकॉर्डिंग करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे, खंडणीच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी त्यांच्या खिशात नोटा टाकून त्याचेही रेकॉर्डिंग करण्यात आले, असे बामुगडे यांनी पोलिसांना सांगितले.

या घटनेमुळे आपल्याला जीवे मारण्याचा किंवा खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, अशी भीती बामुगडे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे संबंधित लोकांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून अधिक तपास सुरू आहे. पत्रकार संघटनेचे राज्य प्रतिनिधी किरण बाथम यांनीही या प्रकरणात बामुगडे यांना सर्वतोपरी मदत केली. बनावट वनअधिकाऱ्यांच्या बातमी प्रकरणात ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.

Total Visitor Counter

2475143
Share This Article