पुण्यातील महिलेवर अटकेची टांगती तलवार
खेड : अल्पवयीन युवतीवर लैंगिक अत्याचार करून ‘कोणाला सांगितल्यास आई हयात राहणार नाही,’ अशी धमकी देणाऱ्या भागोजी उर्फ भगवान कोकरे (मार्कंडी-चिपळूण) या कथित महाराजासह पितेश प्रभाकर कदम (कळंबस्ते-चिपळूण) या दोघांना येथील पोलिसांनी शनिवारी पुन्हा अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, दोघांचीही पुन्हा न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
अल्पवयीन युवतीचा विनयभंग करत बदनामी करण्याची धमकी दिल्याप्रकरणी यापूर्वी अटक केलेल्या भगवान कोकरे आणि पितेश कदम यांना न्यायालयीन कोठडी मिळाली होती. आता अल्पवयीन युवतीचा लैंगिक छळ करणाऱ्या भगवान कोकरे याला कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी विविध राजकीय पक्षांसह लोटे पांकोशीतील ग्रामस्थ एकवटले आहेत. विविध संघटनांकडूनही पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांना निवेदने सादर करत भगवान कोकरेला कठोर शासन देऊन पीडित युवतीला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी मागणी केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणात सहभागी असलेल्या रोहिणी संतोष वामन (पुणे) या महिलेवरही अटकेची टांगती तलवार कायम असल्याचे बोलले जात आहे.