रत्नागिरी : जिल्ह्यातील रिक्षा चालक व मालकांच्या अडचणी सोडविण्यासाठी राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघाचे आमदार मा. किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांच्या नेतृत्वाखाली रिक्षा चालक-मालकांच्या शिष्टमंडळाने मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथराव शिंदे यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या मुक्त रिक्षा परवाना धोरणामुळे स्थानिक रिक्षा व्यावसायिकांना निर्माण झालेल्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा केली. जिल्ह्यातील पारंपरिक रिक्षा चालक-मालकांचा व्यवसाय अडचणीत सापडत असल्याने रत्नागिरी जिल्ह्यात मुक्त परवाना धोरण तत्काळ स्थगित करण्यात यावे, अशी ठाम मागणी या शिष्टमंडळाने केली.
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
या प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. उदयजी सामंत, गृहराज्यमंत्री मा. श्री. योगेश कदम, आमदार मा. श्री. सदानंद चव्हाण, तसेच रत्नदुर्ग रिक्षा चालक-मालक संघटना अध्यक्ष श्री. प्रताप भाटकर, राजापूर तालुका रिक्षा चालक-मालक संघटना सचिव श्री. संतोष सातोसे, 603 रिक्षा संघटना चिपळूण अध्यक्ष श्री. दिलीप खेतले, संजय जोशी, प्रशांत गोरीवले, दिनेश भोजने, सदानंद गोंधळी, शुभम गोंधळी आदींसह जिल्ह्यातील अनेक रिक्षा चालक-मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिक्षा चालक-मालकांच्या समस्यांवर उपाययोजना; आमदार भैय्याशेठ सामंत यांच्या पुढाकाराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
