रत्नागिरी: गणेशोत्सवासाठी मुंबई, पुण्यासह राज्याच्या विविध भागांतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाने मोठे नियोजन केले आहे. गणेशोत्सवासाठी दरवर्षी मुंबई, पुण्यासह राज्यातील विविध शहरांतून हजारो चाकरमानी आपल्या मूळ गावी कोकणात येतात. दहा दिवस उत्साहात गणेशोत्सव साजरा केल्यानंतर पुन्हा कर्मभूमीकडे परतीचा प्रवास सुरू होतो. हा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी रत्नागिरी विभागाने दोन हजार पाचशे एसटी बसेसचे नियोजन केले आहे.
या बसेसचे आरक्षणही सुरू झाले आहे. सात ते पंधरा सप्टेंबरदरम्यान मुंबई, ठाणे, पालघर आदी भागांतून कोकणात येण्यासाठी तब्बल पाच हजार दोनशे वीस बसेसचे नियोजन केले आहे. सोमवारीपासून किमान चाळीस प्रवाशांच्या गटांसाठी गट आरक्षणाला सुरवात झाली आहे. गणेशोत्सवानंतर मुंबईसह अन्य शहरांकडे मोठ्या संख्येने प्रवासी रवाना होतात. त्यामुळे ऐनवेळी होणारी गर्दी आणि आरक्षणासाठीची धावपळ टाळण्यासाठी प्रवाशांनी आगाऊ आरक्षण करण्याचे आवाहन एसटी विभागाने केले आहे. महिला व ज्येष्ठ नागरिकांना पन्नास टक्के, तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के भाडे सवलत लागू राहणार आहे. गणेशोत्सवानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रत्नागिरी विभागाने दोन हजार पाचशे एसटी बसेसचे नियोजन केले असून, आरक्षण सुरू झाले आहे. जास्तीत जास्त प्रवाशांनी ऑनलाइन तसेच गट आरक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी विभागाचे विभाग नियंत्रक अश्वजित जानराव यांनी केले आहे.





