जाकादेवी/ वार्ताहर: महाराष्ट्र राज्यातील साऊ ज्योती महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्था पुणे यांच्यातर्फे मालगुंड गावचे सुपुत्र तसेच बळीराम परकर विद्यालयातील कलाध्यापक शाम गजानन पवार यांना त्यांच्या उल्लेखनीय व देदीप्यमान कामगिरीबद्दल त्यांचा पुणे सामाजिक संस्थेतर्फे राष्ट्रीय भारतभूषण पुरस्कार देऊन त्यांचा पुणे येथे जाहीर सत्कार करण्यात आला.
शाम गजानन पवार हे मालगुंड येथे कलाध्यापक म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी अतिशय गरीब परिस्थितीतून जिद्दीने शिक्षण घेऊन कलाध्यापक म्हणून ते सेवेत रुजू झाले. त्यांनी विविध राष्ट्रीय उपक्रमात स्वतःला झोकून देऊन काम केले. शैक्षणिक ,सामाजिक, सांस्कृतिक, कला , धार्मिक अशा विविध क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेखनीय मानले जाते. विद्यार्थ्यांसाठी सदैव झटणारे कलाशिक्षक म्हणून त्यांची विशेष ओळख आहे .त्यांना यावर्षीचा साऊज्योती सामाजिक संस्थेचा राष्ट्रीय भूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे . हा सन्मान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन हळदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्याची सब इन्स्पेक्टर विष्णू देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
भारत भूषण पुरस्कार विजेते शाम पवार यांना यापूर्वीही विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत.यामध्ये महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण पुणे अध्यापक कलाध्यापक संघाचा राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार, गुरुकुल शैक्षणिक ट्रस्ट डोंबिवली राज्यस्तरीय कला स्पर्धा गौरव पुरस्कार ,रत्नागिरी जिल्हा कलाध्यापक संघाचा उपक्रमशील शिक्षक पुरस्कार, विश्व समता कला मंच लोवळले संगमेश्वर येथील राज्यस्तरीय कलाभूषण पुरस्कार, राज्यस्तरीय कला गौरव महोत्सवी वर्षानिमित्त शिक्षक भूषण पुरस्कार, महाराष्ट्र पत्रकार संघ पुणेचा आदर्श कलाशिक्षक पुरस्कार, महाराष्ट्र पत्रकार संघ पुणे शिक्षक रत्न पुरस्कार अशी विविध पुरस्कार त्यांना आपल्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल प्राप्त झाले आहेत.
श्याम पवार यांच्या यांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मालगुंड शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर तसेच विविध शैक्षणिक सामाजिक संस्था व मित्रमंडळ यांच्यातर्फे शाम पवार यांचे अभिनंदन करण्यात आले. माझ्या राष्ट्रीय पुरस्कारात माझी मालगुंड शिक्षण संस्था, माझे गुरूवर्य,मित्र मंडळ, कुटुंबीय तसेच माझी पत्नी चैताली पवार यांचे योगदान मोलाचे असल्याचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते शाम पवार यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.