रत्नागिरी: जिल्हा परिषद शाळा पूर्णगड नं. १, ता. जि. रत्नागिरी येथे रक्षाबंधन आणि ‘एक राखी वृक्षासाठी’ असे दोन उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. या नाविन्यपूर्ण उपक्रमांनी विद्यार्थ्यांना सण साजरा करण्यासोबतच पर्यावरणाचे महत्त्वही शिकवले.
शाळेतील कार्यानुभव या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतः पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या. या राख्यांचा वापर करून विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकमेकांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकोपा आणि आपुलकीची भावना वाढीस लागली.
शाळेचा ‘इको-क्लब फॉर मिशन लाईफ’ नेहमीच अशा पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये अग्रेसर असतो. या वर्षीही या क्लबच्या माध्यमातून ‘एक राखी वृक्षासाठी’ हा खास उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी झाडांचे पूजन केले आणि त्यांना राख्या बांधून त्यांच्या रक्षणाची शपथ घेतली. ‘झाडे लावा, झाडे जगवा आणि त्यांचे रक्षण करा’ हा महत्त्वपूर्ण संदेश या निमित्ताने देण्यात आला.
शाळेच्या मुख्याध्यापिका भारती तायशेटे यांच्या मार्गदर्शनाखाली, शिक्षक पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे आणि राजेंद्र रांगणकर यांनी हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. या उपक्रमांचे केंद्रप्रमुख संजय राणे सर, शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थ यांनी कौतुक केले असून, शाळेच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले आहे.