GRAMIN SEARCH BANNER

आमदार अमित साटम मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष

मुंबई: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून आमदार अमित साटम यांची आज, सोमवारी मुंबई अध्यक्षपदी निवड करण्यात आली. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मावळते अध्यक्ष आशिष शेलार यांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली.साटम हे आपल्या आक्रमक वक्तृत्व शैलीसाठी प्रसिद्ध आहेत.

आमदार आशिष शेलार यांचा मुंबई भाजपा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला. त्यानंतर आता भाजपाने आमदार अमित साटम यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.

यावेळी पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, आशिष शेलार यांनी मुंबई विभागाचे अध्यक्षपद समर्थपणे सांभाळले. 2017 च्या निवडणुका असतील, आत्ताच्या निवडणुका त्यांनी उत्तम काम केले आहे. मंगलप्रभात लोढा यांनी उत्तम रितीने कार्यभार सांभाळला. पुन्हा आशिष शेलार यांच्याकडे धुरा आली, विधानसभेत चांगले यश मिळाले. मुंबईतील नंबर एकचा पक्ष म्हणून सिद्ध केले.

अमित साटमांकडे मुंबईच्या राजकारणाची जाण आणि कल्पकता – फडणवीस

दरम्यान नव्या संघटनात्मक रचनांकडे अमित साटम यांच्याकडे भार आला आहे. अमित साटम तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेत, नगरसेवक होते. प्रदीर्घ कार्यकाळ राहिला आहे. संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. अभ्यासू आणि आक्रमक अशी अमित साटम यांची प्रतिमा आहे. मुंबईच्या राजकारणाची जाण आणि कल्पकता त्यांच्याकडे आहे. येत्या काळात त्यांच्या नेतृत्वाखालील भाजप मुंबईत घोडदौड राखेल, असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला. पुन्हा महायुतीची मुंबईत सत्ता येईल हा विश्वास आहे. सर्व संघटनात्मक जबाबदाऱ्या ते चांगल्या पद्धतीने पार पडतील. सर्व ज्येष्ठ नेते त्यांच्या पाठीमागे आहेत, असे म्हणत फडणवीसांनी अमित साटम यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

राजकीय कारकीर्द

अमित साटम यांनी गेली अनेक वर्षे मुंबईच्या पश्चिम उपनगरात नगरसेवक, ऑक्टोबर 2014 पासून तीन वेळा अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांना मुंबईतील नागरी प्रश्नांची चांगली जाण आहे. त्यांनी विधानसभा आणि विविध व्यासपीठांवर भाजपची बाजू आक्रमकपणे मांडण्याचे काम केले आहे.

साटम यांचा जन्म 15 ऑगस्ट 1976 रोजी मुंबई येथे झाला. 1998 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या मिठीबाई कॉलेज ऑफ आर्ट्समधून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयात बॅचलर ऑफ आर्ट्स पूर्ण केले. पुढे त्यांनी महात्मा गांधी मिशन्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीजची (कार्मिक) पदवी घेतली.

Total Visitor Counter

2475129
Share This Article