सह्याद्रीच्या मुकुटमणीचे जतन करण्यासाठी तरुणाई सरसावली
संगमेश्वर: महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे महत्त्व आणि त्यांचे जतन करण्याच्या उद्देशाने ‘संगमरत्न फाउंडेशन’ आणि ‘आम्ही कोकणकर’ यांनी संयुक्त विद्यमाने ‘सह्याद्रीचा मुकुटमणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री प्रचितगडावर तिसऱ्या श्रमदान मोहिमेचे आयोजन केले आहे. २५ व २६ ऑक्टोबर २०२५ या शनिवार आणि रविवार रोजी ही मोहीम राबवण्यात येणार आहे. ‘बलदंड दुर्गमदुर्ग श्री प्रचितगडाची प्रचिती आता कळायलाच हवी’ या हाकेतून तरुणांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रचितगड श्रमदान मोहीम क्र-०३ साठीचा प्रवास २४ ऑक्टोबर २०२५ च्या रात्री ८ वाजता दादर टी टी/पुणे येथून शृंगारपूर गावाकडे सुरू होईल. मोहिमेसाठी निवडलेले शृंगारपूर गाव हे संगमेश्वर तालुक्यात आहे, जेथे २५ ऑक्टोबरला पहाटे ५ वाजता एकत्र भेटण्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे. मोहीम शुल्क प्रति व्यक्ती ८०० रुपये असून, यामध्ये प्रवासाव्यतिरिक्त गडावरील राहण्या-जेवणाची आणि श्रमदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
मोहिमेच्या पहिल्या दिवशी, २५ ऑक्टोबरला सकाळी ५:३० वाजता गड चढाईला सुरुवात होईल आणि सकाळी ९:३० वाजता गडमाथ्यावर पोहचणे अपेक्षित आहे. सकाळी १०:०० वाजल्यापासून श्रमदान मोहिमेला सुरुवात होणार आहे. दुपारी १:३० वाजता भोजन आणि दोन तासांच्या विश्रांतीनंतर पुन्हा ३:३० वाजता श्रमदानाचे कार्य सुरू होईल. सायंकाळी ६:३० वाजता पहिल्या दिवसाचा श्रमदान समारोप होईल. रात्री ८:०० वाजता रात्रीच्या भोजनानंतर ९:०० वाजता कवितावाचन, अभिवाचन (सादरकर्ते श्री सुमेध वैद्य सर) आणि ९:३० वाजता शाहिरी कार्यक्रम (सादरकर्ते – अभिषेक दादा पाटील) अशा मनोरंजन कार्यक्रमांची मेजवानी असेल.
दुसऱ्या दिवशी, २६ ऑक्टोबर २०२५ ला सकाळी ७:०० वाजता श्रमदान मोहीम पुन्हा सुरू होईल आणि सकाळी ११:३० वाजता ती समाप्त होईल. श्रमदान पूर्ण झाल्यानंतर दुपारी १२:०० वाजता गड उतरण्यास सुरुवात होईल आणि ३:१५ वाजता शृंगारपूर पायथा गावी पोहचल्यानंतर शाकाहारी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
यानंतर, सायंकाळी ५:०० वाजता छत्रपती संभाजी महाराज स्मारक, कसबा दर्शन, श्री कर्णेश्वर मंदिर दर्शन आणि सरदेसाई वाडा या ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन कोकणच्या संस्कृतीचा अनुभव घेता येणार आहे. सायंकाळी ६:०० वाजता मुंबई/पुणेकडे परतीचा प्रवास सुरू होईल, रात्री ९:३० वाजता रात्रीचे जेवण (शाकाहारी) करून २७ ऑक्टोबर २०२५ ला पहाटे ४:०० वाजता दादर टी टी/पुणे येथे मोहीम समाप्त होईल.
ज्यांना प्रत्यक्ष मोहिमेत सहभागी होणे शक्य नाही, ते या उपक्रमाला वस्तू स्वरूपात किंवा आर्थिक सहकार्य (गुगल पे नंबर ९७७३१४२८१९) करू शकतात, असे आयोजकांनी कळवले आहे. अधिक माहितीसाठी कृष्णा येद्रे (९७७३१४२८१९), सागर मालुसरे (८८९८३०२२४६), सोनाली चव्हाण (९५९४९७४९९६), रमेश शिरगावकर (९६५३६३२१६८) आणि मनाली करण (८७६६८९९५३३) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.