रत्नागिरी : तालुक्यातील गावखडी, सुतारवाडी येथे कौटुंबिक वादातून एका ६५ वर्षीय वृद्धाने विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनंत विठ्ठल मांडवकर असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांचा रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंत विठ्ठल मांडवकर हे त्यांच्या पत्नी शुभांगी अनंत मांडवकर यांच्यासोबत मूळ गावी गावखडी येथे राहत होते. १२ जुलै २०२५ रोजी पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादामुळे शुभांगी मांडवकर रागाने आपल्या मुलाकडे राहण्यासाठी गेल्या होत्या. घरी अनंत मांडवकर एकटेच असताना, त्यांनी ‘इन्पॅक्ट’ नावाचे विषारी कीटकनाशक प्राशन केले.
शेजारील लोकांना ही बाब लक्षात येताच, त्यांनी तात्काळ अनंत मांडवकर यांना उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल केले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच, १३ जुलै रोजी रात्री ८.५० वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
रत्नागिरी गावखडी येथे कौटुंबिक वादातून वृद्धाची आत्महत्या
