चिपळूण: कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्या भव्य क्रीडांगणावर आयोजित होणाऱ्या शासन पुरस्कृत राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी व सहकार साहित्य संमेलनाच्या तयारीने आता वेग घेतला आहे. या संमेलनाच्या मंडप उभारणीचा औपचारिक उद्घाटन सोहळा आज, गुरुवारी सकाळी ११ वाजता संमेलन संयोजन समितीचे अध्यक्ष प्रकाशजी देशपांडे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, प्रमुख कार्यवाह डॉ. निखिल चोरगे आणि स्मरणिका छपाई समितीच्या अध्यक्षा सौ. अंजली चोरगे यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामीण आणि कृषी संस्कृतीचा वारसा जपणारे हे संमेलन भव्य स्वरूपात पार पडणार असून, त्यासाठीच्या पायाभूत सुविधांची उभारणी आजपासून अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे.
या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे कोषाध्यक्ष अजय चव्हाण, प्रसिद्धी व प्रचार समिती प्रमुख डॉ. शमिका चोरगे, सचिव मिलिंद सुर्वे, प्राचार्य डॉ. संकेत कदम, प्राचार्य सचिन तांबेकर आणि रावसाहेब सुर्वे यांसह विविध समित्यांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. आगामी काळात होणाऱ्या या मोठ्या साहित्य सोहळ्यासाठी क्रीडांगणावर भव्य मंडप व इतर तांत्रिक कामे युद्धपातळीवर पूर्ण केली जाणार असून, या सोहळ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.






