संगमेश्वर:- तालुक्यातील कुरधुंडा येथे एका व्यक्तीचा तोल जाऊन बंधाऱ्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हा अपघात दारूच्या नशेत घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
प्रमोद प्रभाकर मेढेकर (वय ४७, रा. सीऊड, नवी मुंबई) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. प्रमोद मेढेकर हे त्यांचा मित्र दीपक मुकुंद खडपेकर यांच्यासोबत ४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी पनवेलहून सावंतवाडी-दिवा पॅसेंजरने संगमेश्वरला आले होते. दुपारी दोन वाजता ते संगमेश्वर रेल्वे स्टेशनवर उतरले. ते त्यांच्या लहानपणीच्या मित्राच्या (मंगेश जाधव) वडिलांची तब्येत विचारण्यासाठी कुरधुंडा बौद्धवाडी येथे आले होते.
मात्र, मित्राने त्यांना नंतर भेटण्याचे सांगितले. त्यानंतर प्रमोद आणि दीपक यांनी संगमेश्वर येथील हायवे लगतच्या एका बारमधून दारू खरेदी केली आणि रिक्षाने करखंडाकडे निघाले.
रस्त्यात गावराहट येथील सिमेंट-काँक्रीट बंधाऱ्यावर थांबून ते दारू पीत असताना, अचानक प्रमोद मेढेकर यांचा तोल गेला आणि ते बंधाऱ्याच्या पाण्यात पडले. या घटनेत त्यांच्या डोक्याला आणि उजव्या कानामागे गंभीर दुखापत झाली आणि रक्तस्राव सुरू झाला.
दीपक खडपेकर आणि स्थानिक गावकऱ्यांनी मिळून प्रमोद यांना तातडीने उपचारासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
कुरधुंडा येथे मद्यप्राशन केलेल्या व्यक्तीचा बंधाऱ्यात पडून मृत्यू
