इतका प्रकार घडत असताना शिक्षक झोपले होते का?
लांजा : तालुक्यातील एका शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मात्र एवढा गंभीर प्रकार घडूनही संबंधित शाळेतील शिक्षकांना काहीच सुगावा लागला नाही, हे जनतेला अक्षरशः धक्कादायक वाटत आहे. त्यामुळे गावात आणि तालुक्यात शिक्षकांविरोधात तीव्र संताप उसळला असून, “विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे शिक्षकांचे लक्ष आहे का नाही?”, “अशा शिक्षकांना शाळेत ठेवायचे तरी का?” इतका प्रकार घडत असताना शिक्षक झोपले होते का? असे प्रश्न आता सर्वत्र चर्चिले जात आहेत.
घटनेनंतर शिक्षकांनी मौन धारण केल्याने नागरिकांचा संताप आणखी भडकला आहे. “तेरी भी चूप, मेरी भी चूप” या धोरणाने संपूर्ण शिक्षकवर्ग गप्प बसल्याचा आरोप पालकांकडून होत आहे. जनतेतून असा सूर व्यक्त केला जात आहे की, शाळा ही मुलांसाठी सुरक्षित ठिकाण असायला हवी, पण येथेच जर दुर्लक्ष आणि बेजबाबदारपणा दिसत असेल तर जबाबदारी कोणाची?
अनेक पालकांनी अशा निष्क्रिय शिक्षकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. वर्गात वेळ घालवणारे शिक्षक फक्त पगारासाठी येतात का? अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहेत.
या प्रकरणाने शिक्षकांच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, प्रशासनाने तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
लांज्यातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर शिक्षकांबद्दल संताप
