GRAMIN SEARCH BANNER

लोकलच्या दर्शनी भागावर लागणार कॅमेरे, रेल्वे रुळांवरील प्रत्येक दृश्य होणार कैद

मुंबई : मुंब्रा दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन जागे झाले असून प्रत्येक रखडलेल्या कामाला गती देण्यात येत आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि विम्यासंबंधित गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी लोकलच्या दर्शनी भागावर कॅमेरे लावण्याच्या योजनेला गती देण्यात आली आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील २५ लोकल गाड्या आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील ३० लोकलला कॅमेरे बसवण्यात आले आहेत. येत्या वर्षभरात त्यात वाढ केली जाणार आहे.

मध्य रेल्वेवरील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ धावत्या लोकलमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर सर्व स्तरातून प्रशासनावर टीका करण्यात आली. नेमका अपघात कसा झाला याबाबत अनेक तर्क, अंदाज व्यक्त करण्यात आले. नागरिकांनी त्यांच्या फोनमधील कॅमेराच्या माध्यमातून केलेल्या चित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्या. या घटनेनंतर सुरक्षेच्या उपाय योजनांमध्ये वाढ करण्याबरोबर रेल्वे प्रशासनाने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकलच्या मार्गावर होणाऱ्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

विम्या संबंधित गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी, विशेषतः धावत्या लोकलमधून प्रवासी पडण्याच्या घटनांमध्ये सीसीटीव्ही चित्रीकरण पुरावा म्हणून वापरण्यासाठी, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे मंडळाने मध्य, पश्चिम रेल्वे विभागातील लोकलच्या दर्शनी भागात कॅमेरे बसवण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम रेल्वेवरील ११२ लोकल रेकच्या दोन मोटरमन केबिनबाहेर हे कॅमेरे लावण्यात येणार आहेत. एकूण २२४ लोकल केबिनपैकी ६१ लोकल केबिनला कॅमेरे बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. हे कॅमेरे २ मेगा पिक्सलचे आहेत. लोकल प्रवासाची संपूर्ण माहिती कॅमेऱ्यात टिपली जाईल.

प्रयोगासाठी खर्च किती?

एका लोकलच्या दोन्ही केबिनला कॅमेरे बसवण्यासाठी १.८४ लाख रुपयांचा खर्च येतो. मध्य रेल्वे मार्गावरील २५ लोकल रेकच्या केबिनबाहेर ५० कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यासाठी जवळपास ९२ लाख रुपये खर्च होणार आहेत. उर्वरित लोकल रेकला कॅमेरे लावण्याचे काम सुरू आहे. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावरील ११२ गाड्यांच्या हिशोबानुसार साधारण ४ कोटी १२ लाख रुपयांचा खर्च होईल.

लोकल प्रवासादरम्यान होणाऱ्या घटनांवर लक्ष ठेवता येण्यासाठी आणि विमा संबंधित फसवणूक रोखता येईल. तसेच कोणतीही दुर्घटना किंवा गैरवर्तणूक झाल्यास, सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारावर तपासणी करणे सोपे होईल, अशी माहिती मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Total Visitor Counter

2475388
Share This Article