चिपळूण : तालुक्यातील सावर्डे येथे किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीमध्ये एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना १६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता सावर्डे बाजारपेठेतील एसटी स्टॉपजवळ असलेल्या सर्व्हिस रोडवर घडली. जखमी राजाराम महादेव घाणेकर (वय ४३) हे कामासाठी सावर्डे येथे आले होते. त्यावेळी आरोपी पंढरीनाथ आत्माराम पिरधनकर हे त्यांची चारचाकी गाडी घेऊन येत असताना, राजाराम घाणेकर गाडीसमोर आले. त्यांनी गाडीच्या बोनेटवर आणि आरशांवर मारून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
या घटनेमुळे संतापलेल्या आरोपी पंढरीनाथ पिरधनकर यांनी गाडीतून उतरून राजाराम यांना हाताने धक्का दिला. धक्का लागल्याने राजाराम सर्व्हिस रोडच्या बाजूला असलेल्या सिमेंटच्या कठड्यावर पडले. यात त्यांच्या डाव्या कानाच्या वरील बाजूस डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि रक्तस्राव सुरू झाला. या घटनेनंतर ते बेशुद्ध अवस्थेत पडले. त्यांना तात्काळ डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
राजाराम घाणेकर यांचे भाऊ नारायण महादेव घाणेकर (वय ५३) यांनी या घटनेची तक्रार १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६:०० वाजता पोलिसांत दाखल केली. पोलिसांनी आरोपी पंढरीनाथ पिरधनकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
सावर्डेत किरकोळ वादातून हाणामारी, एकाच डोकं फोडलं
