चिपळूण: मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबस्ते फाटा येथे २ लाख रुपये किमतीची कार चोरी केल्याप्रकरणी एकावर सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खलील महामूद खोत (४४, रा. कळंबस्ते) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. प्रवीण कृष्णा खांबे (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण खांबे हे चिपळूण शहरात गस्त घालत असताना कळंबस्ते फाटा येथे त्यांना खलील खोत याच्या ताब्यात संशयास्पद कार आढळून आली. खांबे यांनी खोतकडे या गाडीच्या मालकी हक्काबाबत विचारणा केली असता, त्याला समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे ही गाडी चोरीची असल्याची खात्री झाल्याने खांबे यांनी अखेर खोत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.