खेड : तालुक्यातील गुणदे ग्रामपंचायतीने ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत प्लास्टिकमुक्तीसाठी कंबर कसली आहे. प्लास्टिकच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम ग्रामस्थांना समजावून सांगण्यासाठी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती सुरू करण्यात आली आहे. परिसरात प्लास्टिकमुक्त उपक्रम प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
ग्रामपंचायत हद्दीतील सर्व शाळांमध्ये पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिम तलावात शाडू मातीच्या गणपतीचे विसर्जन करावे, असे आवाहन करत या कार्यक्रमात जनजागृती करण्यात आली.
“फक्त एका दिवसाच्या उपक्रमाने प्लास्टिक प्रदूषण संपणार नाही. त्यामुळे गाव प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा,” असे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे. पर्यावरणपूरक पिशव्या आणि वस्तू वापरून ‘वसुंधरेचे रक्षण’ करण्यासाठी ग्रामस्थांचे एकत्रित प्रयत्न महत्त्वाचे आहेत.
पुनर्वापर आणि पुनर्विकसन याला प्राधान्य देत गाव प्लास्टिकमुक्त करण्यासाठी सर्वांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन सरपंच रवींद्र आंब्रे, उपसरपंच रूणाली आंब्रे आणि ग्रामपंचायत अधिकारी आरती मेरे यांनी केले आहे.
खेडमधील गुणदे ग्रामपंचायतीचा प्लास्टिकमुक्तीसाठी पुढाकार; विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती सुरू
