पालशेतचे सुपुत्र ज्येष्ठ शाहिर सुधाकर गावणकर यांचे निधन; कोकणातील लोककला क्षेत्रात मोठी पोकळी

Gramin Varta
178 Views

गुहागर/ उदय दणदणे: कोकणातील लोककला जपणारे आणि समाजप्रबोधनासाठी आयुष्य वाहून घेणारे गुहागर तालुक्यातील पालशेत गावचे सुपुत्र, ज्येष्ठ शाहिर सुधाकर रामचंद्र गावणकर यांचे शनिवार दिनांक १८ जुलै २०२६ रोजी निधन झाले असून, त्यांच्या निधनाने कोकणातील लोककला क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गेली ३० ते ३४ वर्षे ते शाहिरी लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य करत होते आणि नमन व कलगी तुरा लोककलेसाठी त्यांनी अनेक काव्यलेखन करून ते स्वतः गायले देखील. चंडिकेच्या मंदिरात चार बळी, औदसेचा फेरा, लक्ष्मी औदसा ही त्यांनी लिखित केलेली वगनाट्य खूप गाजली असून अशी अनेक वगनाट्य व लोकगीते त्यांच्या लेखणीतून आणि आवाजातून रेकॉर्डिंग कॅसेटच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचली आहेत आणि मुंबई रंगमंचावर तसेच कोकणातील विविध ठिकाणी त्यांनी जवळपास दोन दशके कलगी तुऱ्याचे कार्यक्रम सादर केले.

स्व. शाहिर सुधाकर गावणकर यांना कोकण मराठी शाहिर परिषदेच्या वतीने कोकण भूषण पुरस्कार-२०१८ तसेच कोकण व्हिजन फाउंडेशन, कोकण रिपोर्टर आणि सह्याद्री समाचार न्यूज चॅनेल यांच्यामार्फत लोककला भूषण पुरस्कार-२०२३ ने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनामुळे साहित्यिक आणि कलाकार मंडळींनी तीव्र शोक व्यक्त केला असून, कोकणातील लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन शासनाकडून कुटुंबीयांना मदत करावी, अशी मागणी देखील होत आहे. त्यांच्या जाण्याने कलाक्षेत्रात भरून न येणारी पोकळी निर्माण झाली असून कलानिकेतन नृत्य कलापथक झिंबरवाडी-पालशेत, सहकारी कला पथक-निवोशी (भेलेवाडी) सह विविध संस्थांच्या वतीने स्व. शाहिर सुधाकर गावणकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

Total Visitors :
4565607
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *