GRAMIN SEARCH BANNER

दापोली-मंडणगडमध्ये २२ लाखांहून अधिक किमतीचे चरस जप्त; तिघांना अटक

Gramin Varta
357 Views

रत्नागिरी : अमली पदार्थांच्या विरोधात रत्नागिरी पोलीस दलाने “मिशन फिनिक्स” अंतर्गत अत्यंत प्रभावी आणि मोठी कारवाई करत जिल्ह्यात अमली पदार्थांच्या तस्करीचे मोठे रॅकेट उघड केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या धडक कारवाईत दापोली आणि मंडणगड तालुक्याच्या हद्दीतून तब्बल ५.७२९ किलोग्रॅम वजनाचा, सुमारे ₹२२,९२,४००/- किमतीचा चरस सदृश्य अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आतापर्यंत तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, एका आरोपीचा ताबा ठाणे न्यायालयाकडून घेण्यात येणार असल्याने या गुन्ह्याचे स्वरूप आंतरजिल्हा स्तरावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्हा पोलीस प्रमुखांच्या निर्देशानुसार, १५ सप्टेंबर २०२५ रोजी दापोली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. महेश तोरसकर यांना प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर, दापोली तालुक्यातील केळशी किनारा मोहल्ला येथे छापा टाकण्यात आला. येथील रहिवासी अब्रार इस्माईल डायली (वय-३२) याच्या घराजवळ केलेल्या झडतीमध्ये ०.९९८ किलोग्रॅम वजनाचा, सुमारे ₹४,००,०००/- किमतीचा चरस सदृश्य अमली पदार्थ मिळून आला. हा चरस ‘सिक्स गोल्ड (6-Gold)’ लिहिलेल्या वेष्टनात पॅक केलेला होता. दापोली पोलीस ठाण्यात या आरोपीविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला.

पहिल्या आरोपीच्या कसून चौकशीत, त्याला हा चरस केळशी येथेच राहणाऱ्या अकिल अब्बास होडेकर (वय-४९) याने विक्री करण्याच्या उद्देशाने दिला होता, हे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्काळ अकिल होडेकर याला ताब्यात घेतले. त्याने चौकशीत आणखी ४ पिशव्यांमध्ये चरस असल्याचा आणि तो साठा मंडणगड तालुक्यातील साखरी गावाच्या समुद्र किनारी झुडुपात लपवून ठेवल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी साखरी समुद्र किनारी जाऊन पंचनामा करत त्या चार पिशव्या ताब्यात घेतल्या. साखरी किनारी जप्त करण्यात आलेल्या चरसचा साठा ४.७३१ किलोग्रॅम वजनाचा असून, त्याची किंमत ₹१८,९२,४००/- इतकी आहे. अशा प्रकारे जप्त करण्यात आलेल्या चरस सदृश्य अमली पदार्थाचे एकूण वजन ५.७२९ किलोग्रॅम आणि एकूण किंमत ₹२२,९२,४००/- इतकी झाली आहे.
या गुन्ह्याचा कसून तपास करत असताना या प्रकरणी आणखी एका व्यक्तीचा सहभाग निष्पन्न झाल्याने ताबीस महमूद डायली (वय-३०) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत आतापर्यंत एकूण तीन आरोपींना अटक झाली आहे. विशेष म्हणजे, या गुन्ह्यातील आणखी एक आरोपी मसुद बदुद्दीन ऐनरकर (वय-२९, रा. खोंडा दापोली) याचा सहभाग निष्पन्न झाला असून, तो शिळ डायघर पोलीस स्टेशन, ठाणे शहर येथे दाखल असलेल्या एन.डी.पी.एस. गुन्ह्यात आरोपी असल्याने रत्नागिरी पोलीस लवकरच मा. न्यायालय, ठाणे यांच्याकडून त्याचा ताबा घेणार असून त्याच्याकडेही कसून चौकशी करण्यात येणार आहे.

या अमली पदार्थ गुन्ह्याचे अनुषंगाने आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असून, अधिक तपास सुरु आहे. खेड उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शेलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. महेश तोरसकर आणि पोलीस उपनिरीक्षक श्री. यादव, श्री. पाटील यांच्यासह सर्व अंमलदार यांनी ही महत्त्वपूर्ण कामगिरी यशस्वी केली आहे.

Total Visitor Counter

3200153
Share This Article