GRAMIN SEARCH BANNER

मिरजोळे–मजगाव–करबुडे–उक्षी मार्गावर गतिरोधक बसवा

Gramin Varta
565 Views

वाहनांचा वाढता वेग, अपघातामुळे ग्रामस्थांची मागणी

रत्नागिरी : तालुक्यातील मिरजोळे–मजगाव मार्गे करबुडे–उक्षी हा रस्ता सध्या अपघातांचा हॉटस्पॉट बनत चालला आहे. रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे झाल्याने अनेक वाहनचालक या मार्गावर अतिवेगात वाहने चालवत असून, त्यामुळे अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. पादचारी आणि स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे.

हा मार्ग थेट मुंबई–गोवा महामार्गाला जोडणारा असल्याने, तसेच महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे वेळ वाचवण्यासाठी लहान-मोठी अनेक वाहने पर्यायी मार्ग म्हणून याच रस्त्याचा वापर करत आहेत. परिणामी या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली असून हलकी तसेच अवजड वाहनेही वेगाने धावत असल्याचे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर मजगाव, फणसवळे, शीळ, दांडेआडोम, वेतोशी आणि करबुडे परिसरातील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीची मागणी केली आहे. अपघातांना आळा घालण्यासाठी आणि वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी या रस्त्यावर योग्य ठिकाणी गतीरोधक (स्पीड ब्रेकर) बसवावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.
वेळीच आवश्यक उपाययोजना न केल्यास भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे प्रशासनाने या मागणीची दखल घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Total Visitor Counter

3379938
Share This Article