चिपळूण : सह्याद्रीच्या डोंगररांगांपासून कोकणातील दाट जंगलांपर्यंत दुर्मीळ ब्लॅक पँथर अर्थात काळ्या बिबट्यांच्या हालचाली वाढल्याचे चित्र समोर येत आहे. गेल्या काही वर्षांत कोकणात काळ्या बिबट्यांचे दर्शन घडण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, वन्यजीव अभ्यासक आणि वन विभागासाठी ही बाब महत्त्वाची मानली जात आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातही मेलेनिस्टिक लेपर्डची नोंद झाल्याने या भागातील जैवविविधतेला नवे महत्त्व प्राप्त झाले आहे.
वन्यजीवांच्या स्थलांतरासाठी सह्याद्री ते कोकण हा महत्त्वाचा मार्ग समजला जातो. कर्नाटकाच्या जंगल भागातून तिलारी आणि आंबोली मार्गे येणारे अनेक वन्यप्राणी सह्याद्री परिसरात काही काळ वास्तव्य करून पुढे कोकण किनारपट्टीच्या दिशेने सरकत असल्याच्या नोंदी वन विभागाकडे आहेत. याच मार्गावर काळ्या बिबट्यांचाही वावर वाढल्याचे स्पष्ट होत आहे.
ब्लॅक पँथर ही स्वतंत्र प्रजाती नसून, तो बिबट्याचाच एक दुर्मीळ प्रकार असल्याचे तज्ज्ञ सांगतात. शरीरात मेलानिन या रंगद्रव्याचे प्रमाण अधिक झाल्यामुळे त्याचा रंग गडद काळा दिसतो. काही वेळा शरीरावरील ठिपक्यांचा पॅटर्नही दिसून येतो. दाट जंगलात सहज लपून राहण्यासाठी हा रंग उपयुक्त ठरत असल्याने सदाहरित वनक्षेत्रांमध्ये अशा बिबट्यांचे प्रमाण अधिक आढळते.
वन विभागाच्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, देवरूख, लांजा, गुहागर, संगमेश्वर, दापोली आणि खेड परिसरात काळ्या बिबट्यांचा वावर नोंदवण्यात आला आहे. राज्यातील ताडोबा, पेंच, नवेगाव-नागझिरा, कोयना, राधानगरी, चांदोली आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परिसरातही काळे बिबटे आढळून आले आहेत. मात्र, कोकणातील विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील संख्या लक्षणीय असल्याचे निरीक्षण वन्यजीव अभ्यासकांनी नोंदवले आहे.
वन्यजीव अभ्यासकांच्या अंदाजानुसार कोकणात सध्या २५ हून अधिक काळे बिबटे असण्याची शक्यता आहे. अन्नाच्या शोधात हे बिबटे काही वेळा मानवी वस्त्यांच्या दिशेने येत असल्याने मानव आणि वन्यजीव संघर्षाची शक्यताही वाढू लागली आहे. त्यामुळे त्यांच्या नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण करणे आणि जंगल क्षेत्र सुरक्षित ठेवणे अत्यावश्यक असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
चिपळूणचे परिक्षेत्र वनाधिकारी सर्वर खान यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, काळे बिबटे दिसल्यास घाबरून जाऊ नये किंवा त्यांना इजा पोहोचवू नये. एखादा बिबट्या जखमी अवस्थेत अथवा मानवी वस्तीत अडकलेला आढळल्यास तातडीने वन विभागाशी संपर्क साधावा. तर व्याघ्रप्रेमी अनिकेत बापट यांनी कोकणातील काळ्या बिबट्यांचा वाढता वावर हा पर्यावरणाच्या दृष्टीने सकारात्मक संकेत असल्याचे सांगत त्यांच्या सुरक्षित अधिवासासाठी व्यापक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली.






