डॉ. संदीप करे यांची रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनच्या अध्यक्षपदी निवड; सामाजिक कार्याचा वसा पुढे नेण्याचा निर्धार

Gramin Varta
70 Views

रत्नागिरी : हॉटेल संगम रेसिडेन्सी येथे पार पडलेल्या एका शानदार पदग्रहण सोहळ्यात डॉ. संदीप करे यांनी रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. मावळत्या अध्यक्षा डॉ. सौ. सपना करे यांच्याकडून त्यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला असून, २०२६-२७ या कार्यकाळासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून सुहास जोशी (DGND 3172), अशोक नाईक (DGND 3171) यांच्यासह असिस्टंट गव्हर्नर श्रीकांत भुर्के आणि अविनाश पालशेतकर यांची विशेष उपस्थिती होती.

गेल्या २१ वर्षांपासून रत्नागिरीत सामाजिक कार्याची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या या क्लबच्या वतीने राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा मावळत्या अध्यक्षा डॉ. सौ. स्वप्ना करे यांनी आपल्या मनोगतातून घेतला. यावेळी राजेंद्र कदम, वामन सावंत आणि सीताराम सावंत यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सेक्रेटरी राजेंद्र कदम यांनी आपल्या वार्षिक अहवालातून ग्रामीण भागातील आरोग्य शिबिरे, महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रम, शैक्षणिक साहित्याचे वाटप आणि स्तनदा मातांसाठी राबवलेले उपक्रम यांसारख्या कार्याचा लेखाजोखा मांडला.

सुहास जोशी यांच्या हस्ते डॉ. संदीप करे यांना अध्यक्षपदाची पिन व कॉलर प्रदान करण्यात आली. या सोहळ्यात सीताराम सावंत यांनी सेक्रेटरी, तर विनायक निकम यांनी खजिनदार म्हणून पदभार स्वीकारला. तसेच डॉ. सौ. संघमित्रा फुले, डॉ. स्नेहल अंधारे, डॉ. अमिता हिप्पळगावकर आणि प्रदीप साळुंखे हे नवीन सदस्य रोटरी परिवारात सामील झाले. आपल्या भाषणात नूतन अध्यक्ष डॉ. संदीप करे यांनी मैत्री, विश्वास आणि समर्पित भावनेतून क्लबचे कार्य अधिक व्यापक करण्याचे उद्दिष्ट व्यक्त केले. या कार्यक्रमास विविध रोटरी क्लबचे पदाधिकारी, सदस्य आणि मान्यवरांची मोठी उपस्थिती होती.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *