रत्नागिरी: रत्नागिरी नगरपरिषद महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) अंतर्गत कोकण विभागातील भारतरत्न सन्मानित महर्षी धोंडू केशव कर्वे, पांडूरंग वामन काणे, विनोबा भावे, डॉ. भीमराव आंबेडकर, लता मंगेश्कर, सचीन तेंडूलकर यांच्या अर्धपुतळ्यांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
या प्रसंगी पालकमंत्री डॉ. उदय सामंत, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार रविंद्र फाटक आदी उपस्थित होते.
नगरपरिषदेच्या श्रीमान हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण प्रांगणात जे जे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांकडून वाहनांच्या सुट्या भागांचा वापर करुन हे पुतळे तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक पुतळा 4 टनाचा आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी 9 महिने परिश्रम घेतले आहेत. प्रत्येक पुतळ्यासमोर त्यांच्या कार्याची माहिती मराठी आणि इंग्रजीमधून देण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी कोनशिला अनावरण करुन आणि कळ दाबून या पुतळ्यांचे लोकार्पण केले. जे जे स्कूल ऑफ ऑर्टचे शिक्षक शशिकांत काकडे, विजय बोंदर, विद्यार्थी विजय पाटील यांचा उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.