मुंबई: मुंबई पोलिस दलातील एन्काऊंटर स्पेशलिस्ट पोलीस निरीक्षक दयानंद (दया) नायक यांना निवृत्तीच्या अगोदरच सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) पदावर बढती देण्यात आली आहे.
गृहविभागाने मंगळवारी नायक यांच्यासह आणखी तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बढतीचे आदेश जारी केले. दया नायक ३१ जुलै रोजी ३१ वर्षांची सेवा पूर्ण करून निवृत्त होत आहेत.
गृहविभागाने जारी केलेल्या आदेशानुसार दया नायक यांच्यासह जीवन खरात, दीपक दळवी (मुंबई) आणि पांडुरंग पवार (जळगाव) यांना एसीपी पदावर बढती देण्यात आली आहे. मुंबईतील नायक, खरात आणि दळवी यांची बदली मुंबई शहरात करण्यात आली असून जळगावचे पांडुरंग पवार यांची बदली जळगावच्या आर्थिक गुन्हे शाखेत झाली आहे.दया नायक यांनी आपल्या कारकिर्दीत तब्बल ८६ एन्काउंटर केले असून त्यात दाऊद टोळीतील २२, राजन टोळीतील २० गुंडांचा समावेश आहे. तसेच लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम (एलटीटीई), लष्कर-ए-तैय्यबा सारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित अनेकांना त्यांनी ठार केले. कुख्यात कंधार विमान अपहरण प्रकरणात सहभागी असलेल्या पाच दहशतवाद्यांपैकी तीन जणांना नायक यांनी चकमकीत ठार केले होते.
१९९० च्या दशकात अंडरवर्ल्डच्या वाढत्या दहशतीला आळा घालण्यासाठी नायक यांनी मोठी भूमिका बजावली होती. १९९५ मधील काळ्या दिवाळीनंतर त्यांनी १९ गुंडांचा एन्काउंटर करून टोळी युद्धात गुंतलेल्या गुंडांना प्रत्युत्तर दिले होते. १९९८ मध्ये मुंबई पोलिसांनी जाहीर केलेल्या टॉप-टेन गुंडांच्या यादीतील सात जणांना नायक यांनी चकमकीत संपवले होते.
एन्काउंटरशिवाय त्यांनी शेकडो महत्त्वाच्या तपासात सहभाग नोंदवला. २००२ आणि २००३ मधील मुंबईतील रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणात सिमी संघटनेच्या सदस्य साकिब नाचनला अटक करण्यामध्येही नायक यांचा महत्त्वपूर्ण वाटा होता. आपल्या सेवेत त्यांनी एक हजाराहून अधिक आरोपींना अटक केली आहे.
निवृत्तीच्या फक्त तीन दिवस आधी मिळालेल्या या बढतीबद्दल दया नायक यांनी आनंद व्यक्त केला. ३१ जुलै रोजी ते अधिकृतपणे पोलिस दलातून निवृत्त होणार आहेत.
दया नायक यांना निवृत्तीपूर्वी एसीपी पदावर बढती
