GRAMIN SEARCH BANNER

देवरुख पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकपदी उदय झावरे रुजू

संगमेश्वर/ दिनेश आंब्रे : रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात पोलीस निरीक्षक उदय जयकुमार झावरे यांची पदस्थापना करण्यात आली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, कोकण भवन, नवी मुंबई यांच्या ३१ मे २०२५ रोजीच्या आदेशानुसार, रायगड-अलिबाग जिल्हा पोलीस दलातून त्यांची रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात बदली झाली होती. देवरुख येथे त्यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात ही काही काळ सेवा बजावली आहे. त्यांच्या काळात संगमेश्वर पोलिस ठाण्यात अनेक गुन्ह्यांची उकल झाली होती.

दरम्यान त्यांची रत्नागिरी मुख्यालयात बदली झाली. त्यानंतर रायगड येथे बदली झाली. तिथून पुढे आता देवरूख येथे पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. या बदली आदेशानंतर पोलीस अधीक्षक, रायगड-अलिबाग यांनी निरीक्षक झावरे यांना कार्यमुक्त केले. त्यानुसार, ११ जून २०२५ रोजी (दुपारनंतर) ते रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर हजर झाले. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांनी दिलेल्या आदेशानुसार, पोलीस निरीक्षक उदय जयकुमार झावरे यांची देवरुख पोलीस ठाणे येथे पदस्थापना करण्यात आली आहे.

निरीक्षक झावरे यांनी तात्काळ देवरुख पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारून, तसा पूर्तता अहवाल रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयास सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या पदस्थापनेमुळे देवरुख पोलीस ठाण्याला नवा चेहरा मिळाला आहे.

Total Visitor Counter

2474941
Share This Article