राजापूर: राजापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कोदवली येथील साहेबाच्या धरणाजवळ नदीकिनारी चार प्राचीन एकपाषाणी शैव गुंफा मंदिरे आढळून आली आहेत. ही मंदिरे तिसऱ्या ते सहाव्या शतकादरम्यान अस्तित्वात असलेल्या वाकाटक राजवटीतील असल्याचा अंदाज इतिहास अभ्यासकांनी वर्तवला आहे. या शोधामुळे राजापूरच्या प्राचीन इतिहासावर नव्याने प्रकाश पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोदवली येथील शिवाजी कुंभार आणि पत्रकार विनोद पवार यांना ही महत्त्वपूर्ण गुंफा मंदिरे शोधण्यात यश आले आहे. सध्या ही मंदिरे घनदाट जंगल आणि झाडीने वेढलेली आहेत.
वाकाटक राजवट ही प्राचीन भारतात तिसऱ्या शतकापासून ते सहाव्या शतकापर्यंत दख्खन आणि आसपासच्या प्रदेशात पसरलेली होती. विंध्यशक्ती हा या साम्राज्याचा संस्थापक मानला जातो. हे साम्राज्य उत्तरेकडे माळवा आणि गुजरातच्या दक्षिण किनाऱ्यापासून दक्षिणेला तुंगभद्रा नदीपर्यंत, तर पूर्वेला बंगालचा उपसागर ते पश्चिमेला अरबी समुद्रापर्यंत विस्तारलेले होते. कोकण प्रदेशही या साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता, असे ऐतिहासिक नोंदी सांगतात. वाकाटक राजांनी एकशिळा मंदिरे आणि गुंफा मंदिरांच्या वास्तुकलेला प्रोत्साहन दिले. त्यामुळे कोदवलीतील ही मंदिरे वाकाटककालीन असावीत, असा अभ्यासकांचा कयास आहे, कारण वाकाटक राजे शिवभक्त असल्याचे इतिहासात उल्लेख आहेत.
दुसऱ्या शतकापासून राजापूर बंदरातून रोमन साम्राज्याशी मोठ्या प्रमाणात व्यापार होत असल्याचे प्राचीन इतिहासात नमूद आहे. बारसू येथे सापडलेली कातळशिल्पे पाहिली तर, राजापूर बंदर अगदी अश्मयुगापासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते. बारसूच्या सड्यावर सापडलेली कातळशिल्पे आणि जगातील प्राचीन मानल्या गेलेल्या चार महान संस्कृतींमधील (सिंधू संस्कृती, मेसोपोटेमियन, इजिप्शियन आणि चीन) मोहोर (सील) वरील चित्रांमध्ये साम्य आढळते. त्या मोहोरवरील चित्रांचे विस्तृत स्वरूप बारसूच्या कातळशिल्पात कोरलेले आहे. यावरून राजापूर बंदर प्राचीन काळापासून जागतिक व्यापाराचे केंद्र होते, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. प्राचीन संस्कृतीतील मोहोरवरील चिन्हे आणि बारसूचे कातळशिल्प यातील साम्य पाहता, या प्राचीन संस्कृतीचा उगम राजापूरच्या बारसूमधून झाला असेल का, हा प्रश्न बारसूच्या कातळशिल्पांच्या अभ्यासानंतर जगासमोर येणार आहे.
या पार्श्वभूमीवर, कोदवली येथे सापडलेली वाकाटक साम्राज्याच्या काळातील ही शैवपंथीय गुंफा मंदिरे राजापूरच्या प्राचीनतेला अधिक महत्त्व देतात. इतिहास अभ्यासकांच्या मते, राजापूर बंदरातून कोदवली मार्गे गोड्या नदीच्या पश्चिम किनाऱ्यावरून या साम्राज्याचा राजमार्ग असावा आणि ही मंदिरे त्याचेच अवशेष असावीत.
राजापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कोदवली येथील इंग्रजकालीन साहेबाच्या धरणाच्या खालच्या बाजूला साधारण ५०० मीटर अंतरावर ही गुंफा मंदिरे आहेत. त्यांच्या रचनेवरून ती शैवपंथीय असल्याचे स्पष्ट होते. ही सर्व मंदिरे एकपाषाणी असून, त्यातील एका मंदिराचा विस्तार मोठा आहे. त्याचे प्रवेशद्वार तीन फूट रुंद आणि पाच फूट उंच असून, आतील भाग साधारण आठ फूट लांब आणि सहा फूट रुंद आहे. उर्वरित तीन मंदिरे तुलनेने लहान आहेत. येथील काही पाषाणांवर अर्धवट कोरलेली मंदिरेही दिसतात.
प्रत्येक गुंफा मंदिरात एक चौथरा असून, मुख्य आणि मोठ्या गुंफा मंदिरातील तीन फूट रुंद आणि चार फूट लांब असलेल्या चौथऱ्याला वरून खालीपर्यंत जाणारे एक छिद्र आहे. कोदवली नदीपात्राला लागून ही गुंफा मंदिरे आहेत आणि त्यांच्या बाजूनेच राजापूर शहराला पाणी पुरवठा करणारी इंग्रजकालीन पाण्याची पाइपलाइन आहे. हा संपूर्ण परिसर लॅटेराईट दगडाचा असून, त्याच दगडात ही गुंफा मंदिरे कोरलेली आहेत. एका गुंफा मंदिराची उंची साधारण तीन फूट असून, आतील भाग तीन फूट लांब आणि दोन फूट रुंद आहे. तिसरे गुंफा मंदिर पहिल्या मंदिराएवढे असले तरी त्याचा आतील भाग चार फूट लांब आणि तीन फूट रुंद आहे, पण सध्या ते पाण्याने भरलेले आहे. चौथे एकपाषाणी गुंफा मंदिर अर्धवट स्थितीत कोरलेले आहे.
या गुंफा मंदिरांचा योग्य आणि विस्तृत अभ्यास झाल्यास राजापूरच्या प्राचीन इतिहासाला एक नवी दिशा मिळेल. सद्यस्थितीत ही मंदिरे अतिशय जंगलमय भागात आणि नदीकिनारी असल्याने त्यांची साफसफाई, जतन आणि संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे.
याच कोदवली नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या शंकरेश्वराच्या मंदिरालगत आणखी एक एकपाषाणी मंदिर असून, त्यात शिवलिंग स्थापित आहे. हे एकपाषाणी मंदिरही साधारण वाकाटक राजवटीतील असल्याचे मानले जाते. मात्र, येथील ग्रामस्थांनी आता या मंदिराला सिमेंट प्लास्टर केले आहे.
वाकाटक साम्राज्य हे प्राचीन भारतातील एक महत्त्वाचे साम्राज्य होते, जे तिसऱ्या ते पाचव्या शतकापर्यंत अस्तित्वात होते. वाकाटकांनी विदर्भ आणि त्यालगतच्या प्रदेशात राज्य केले. त्यांची सत्ता उत्तरेकडे माळवा आणि दक्षिणेकडे तुंगभद्रा नदीपर्यंत पसरली होती, तर पूर्वेला बंगालचा उपसागर आणि पश्चिमेला अरबी समुद्रापर्यंत त्यांचा प्रभाव होता. कोकणावरही त्यांचा अंमल होता. इ.स. ४७५ ते ५०० या काळात वाकाटक राजवंशाचा शेवटचा राजा हरिषेण हा बलाढ्य होता. त्यांच्या याच कालखंडात ही कोदवली येथील शैव लेणी कोरली गेली असावीत, कारण वाकाटक राजे शिवभक्त होते असा उल्लेख इतिहासात सापडतो.