रत्नागिरी : पं. राम मराठे आणि गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दी स्मृती सांगता समारंभानिमित्त संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक, ऑर्गनवादक, मार्गदर्शक विलास हर्षे यांना संगीत रंगभूमी सेवा सहयोग पुरस्कार आणि कलाकार विघ्नेश जोशी यांना चतुरस्र कला संवादक पुरस्कार जाहीर झाला आहे.
नादब्रह्म आणि संगीतभूषण पं. राम मराठे फाउंडेशनच्या वतीने पंडित राम मराठे आणि गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दी स्मृती सांगता समारंभ १४ सप्टेंबरला टिळकनगर, डोंबिवली (पूर्व) येथे होणार आहे. त्यात या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. शाल, श्रीफळ, मानपत्र आणि ५१ हजार रुपये असे या प्रत्येकी पुरस्काराचे स्वरूप आहे. डोंबिवलीच्या कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने १४ सप्टेंबरला संध्याकाळी ४.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत मंडळाच्या समाज मंदिर सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी ज्येष्ठ गायिका, चतुरस्र अभिनेत्री पद्मश्री नयना आपटे, ज्येष्ठ शास्त्रीय गायक, गुरू पंडित प्रदीप नाटेकर, पितांबरी प्रॉडक्ट्सचे संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी युवा तडफदार गायक आणि ऑर्गन वादक, विविध नामवंत कलाकार बहारदार नाट्यसंगीत रजनी सादर करणार आहेत. अमेय रानडे आणि विघ्नेश जोशी हे सूत्रसंचालन, संवादक आहेत. ओंकार प्रभुघाटे, प्राजक्ता मराठे, मृणाल भिडे, सिद्धी बोंद्रे- जोग, प्रेरणा वझे, स्वप्नील गोरे, विशारद गुरव, मुकुंद मराठे आणि नयना आपटे हे गायक आणि विलास हर्षे, धनंजय पुराणिक, मकरंद कुंडले, हर्षल काटदरे, हेरंब जोगळेकर आणि श्रीरंग जोगळेकर, अमित काळकर, आदित्य पानवलकर, प्रथमेश शहाणे, मंगेश चव्हाण असे वादक सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे हे सर्व युवा गायक, वादक विलास हर्षे यांच्या अमूल्य मार्गदर्शनाखाली तयार झाले आहेत. या सर्वांनी राज्य नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट गायक नट, गायिका अभिनेत्री, वादक म्हणून अनेकदा विविध संगीत नाटकांसाठी खास रौप्यपदके प्राप्त केली आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे, जास्तीत जास्त रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन नादब्रह्मच्या वतीने, आयोजक मुकुंद मराठे, डॉ. अरुण नाटेकर, धनंजय पुराणिक आणि मकरंद कुंडले यांनी केले आहे.
रत्नागिरीचे ऑर्गनवादक विलास हर्षे यांना संगीत रंगभूमी सेवा सहयोग पुरस्कार
