सलग तिसऱ्या वर्षी यश संपादन, सह्याद्रीच्या शिरपेचात मानाचा तुरा
सावर्डे: गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित ‘गांधी तीर्थ स्वच्छ शाळा’ या राज्यस्तरीय स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्थेच्या गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने (सावर्डे) एक लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस आणि प्रशस्तीपत्रक पटकावून सलग तिसऱ्या वर्षी आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. या यशाने सह्याद्री शिक्षण संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
महात्मा गांधीजींच्या स्वच्छतेच्या विचारांचे महत्त्व समाजात रुजवावे, विद्यार्थ्यांमध्ये आंतरिक आणि बाह्य स्वच्छतेची जाणीव निर्माण व्हावी, तसेच समाजातील स्वच्छतेविषयीचे गैरसमज दूर होऊन वास्तवाची जाणीव व्हावी, या उदात्त हेतूने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नुकताच जैन हिल्स, जळगाव येथील भव्य कस्तुरबा गांधी सभागृहात या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी पुणे येथील सागर मित्र अभियानाचे सहसंस्थापक विनोद बोधनकर, महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या राज्य सल्लागार परिषदेचे सदस्य अनिल बोरनारे, जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओ मीनल करनवाल, अशोक जैन, अंबिका जैन, गिरीश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यातील तब्बल १४०० विद्यालयांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. मात्र, सह्याद्रीच्या सावर्डे विद्यालयाने वर्षभर अतिशय प्रभावीपणे विविध उपक्रमांवर लक्ष केंद्रित केले. यामध्ये प्लास्टिकमुक्ती शाळा, परिसर स्वच्छता, ग्रामस्वच्छता, वैकुंठभूमी स्वच्छता, पानवठा स्वच्छता आणि प्लास्टिकचे पुनर्वापर व योग्य विल्हेवाट यांसारख्या उपक्रमांचा समावेश होता. यातून समाजात स्वच्छतेबद्दल जनजागृती करण्यासाठी विशेष भर देण्यात आला.
या कामाचे मूल्यमापन एप्रिल महिन्याच्या अखेरीस करण्यात आले. या मूल्यांकनात सह्याद्रीच्या या विद्यालयाने ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ टप्पा क्रमांक एक मध्ये विभागात दुसरा क्रमांक पटकावला, तर टप्पा क्रमांक दोनमध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावरच विद्यालयाने सलग तिसऱ्या वर्षी राज्यस्तरीय स्पर्धेत एक लाखाचे पारितोषिक मिळवले आहे.
विद्यालयाने केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखरजी निकम, ज्येष्ठ संचालक व शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर, संस्थेचे सर्व संचालक, सचिव महेश महाडिक, शालेय समिती सदस्य, पालक, शिक्षक संघ सदस्य आणि सर्व शिक्षणप्रेमींनी विद्यालयाचे कौतुक केले आहे. प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर आणि ‘गांधी तीर्थ स्वच्छ शाळा’ समन्वयक जयंत काकडे यांच्यासह विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमाचे हे यश असल्याचे बोलले जात आहे. प्राचार्य राजेंद्र वारे, पर्यवेक्षक उद्धव तोडकर आणि शिक्षक यांनी हे राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारले.