तुषार पाचलकर / राजापूर:तालुक्यातील करक येथील अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पाचे धरण सध्या पूर्ण क्षमतेच्या जवळपास पोहोचले असून, ०४ जुलै २०२५ रोजी धरण ९०% भरले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणातून सांडव्यामार्गे पाण्याचा विसर्ग लवकरच सुरू होण्याची शक्यता असल्याचे पाटबंधारे विभागाच्या वतीने कळवण्यात आले आहे. त्यामुळे गावातील सरपंच, तलाठी यांना 13 गावातील लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुसळधार पावसामुळे अर्जुना व कोदवली नद्यांमधील पाणीपातळी अचानक वाढू शकते. जर पावसाचे प्रमाण अधिक वाढले, तर नदीकाठच्या गावांना पूरस्थितीचा संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे प्रकल्प बांधकाम उपविभाग, लांजा येथील उपविभागीय अधिकारी वि. बि. आंबाळ यांनी राजापूर तालुक्यातील करक, तळवडे, पाचल, रायपाटण, चिखलगांव, गोठणे-दोनीवडे, शिळ, उन्हाळे, कोळवणखडी, सौंदळ, आडवली, परटवली, बागवेवाडी या गावांतील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील यांना ग्रामस्थांना तत्काळ सतर्क करण्याचे निर्देश दिले आहेत.
ग्रामस्थांनी पुढील सूचना मिळेपर्यंत नदीकाठी किंवा नाल्याजवळ जाणे टाळावे, तसेच लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावे. पाण्याचा प्रवाह अधिक झाल्यास काही भागांत वीज आणि दळणवळण सेवा खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज
राजापूर तालुका प्रशासन, पोलीस, स्थानिक ग्रामपंचायती आणि पाटबंधारे विभागाने आपत्कालीन परिस्थितीसाठी पूर्वतयारी ठेवली असून, मदत व बचावकार्याचे नियोजनही करण्यात आले आहे.
या संदर्भात, पाटबंधारे विभागाने कार्यकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग, रत्नागिरी; तहसीलदार, राजापूर; गटविकास अधिकारी, राजापूर; मुख्याधिकारी, नगरपरिषद, राजापूर; आणि उपविभागीय अभियंता, पाटबंधारे बांधकाम उपविभाग क्र.१, लांजा यांनाही माहिती देऊन, त्यांच्या यंत्रणांमार्फत संबंधितांना अवगत करण्याची विनंती केली आहे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सुचना आणि प्रशासनाच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
राजापुरातील अर्जुना धरण ९०% भरले; 13 गावांना सतर्कतेचा इशारा

Leave a Comment