रत्नागिरी : जयगड परिसरातील तिहेरी हत्याकांड प्रकरणात जयगड पोलिस ठाण्यातील आणखी एक पोलिस कर्मचारी अडचणीत सापडला आहे. बेपत्ता तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोपावरून हवालदार सोनावने यांना चौकशीनंतर निलंबित करण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
राकेश जंगम बेपत्ता प्रकरणात जयगड पोलिसांनी दाखवलेल्या हलगर्जीपणावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन दोषींवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर पहिल्या टप्प्यात कर्मचारी कुलदीप पाटील यांची बदली करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
तपासात अनेक बाबी समोर आल्या. ६ जून २०२४ रोजी राकेश जंगम याचा खून करून त्याचा मृतदेह आंबा घाट येथे टाकण्यात आला. चौकशीत मुख्य आरोपी दुर्वास पाटील याने खुनाची कबुली दिली असून या गुन्ह्यात विश्वास पवार आणि नीलेश भिंगार्डे यांचाही सहभाग असल्याचे उघड झाले. मृत राकेश हा दुर्वास पाटील यांच्या खंडाळा येथील बारमध्ये वेटर म्हणून काम करत होता.
२१ जून २०२४ रोजी राकेशची आईने जयगड पोलिस ठाण्यात बेपत्ता तक्रार दिली होती. मात्र योग्य ती दखल न घेतल्याने चौकशीत निष्काळजीपणा सिद्ध झाल्यानंतर हवालदार सोनावने यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
रत्नागिरी : जयगड तिहेरी हत्याकांड प्रकरणी पोलिस निलंबित





