सत्ताधारी-प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिक त्रस्त
रत्नागिरी: ‘स्मार्ट सिटी’च्या वल्गना करणाऱ्या रत्नागिरी नगर परिषदेचा भोंगळ कारभार आणि नियोजनशून्य विकासकामांचा विचका पहिल्याच पावसाने उघडा पाडला आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर व एसटी कॉलनीत गटारांचे पाणी साचल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून, सत्ताधाऱ्यांचे दावे पूर्णपणे फोल ठरले आहेत.
रत्नागिरी नगर परिषदेच्या दाव्यांमधील हवा पहिल्याच पावसाने काढून घेतली आहे. ‘स्मार्ट सिटी’च्या गप्पा मारणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा आणि प्रशासनाचा भोंगळ कारभार आता उघडा पडला असून, शहरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी “पुढील वीस वर्षे रस्त्यांचा प्रश्न सुटला” असे म्हणत विरोधकांना सुनावले होते. मात्र, आज शहरातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था पाहता पालकमंत्र्यांचे ते दावे हवेत विरले असून रस्त्यांचे नियोजन पूर्णपणे फसल्याचे स्पष्ट दिसत आहे.
शहरातील राज्य परिवहन मंडळाच्या वसाहती जवळील म्हणजेच एसटी कॉलनी परिसरातील रस्त्याला सध्या ओढ्याचे स्वरूप आले आहे. गटारे तुंबल्यामुळे सांडपाणी आणि पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. या दूषित पाण्यातून मार्ग काढताना पादचारी आणि दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेकदा हे घाण पाणी अंगावर उडत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रत्नागिरी शहराला नैसर्गिक उतार आहे, तरीही रस्त्यांवर पाणी साचत आहे, यावरूनच सत्ताधाऱ्यांनी आणि अभियंत्यांनी रस्त्यांचे काम करताना उताराचा अजिबात अभ्यास केला नसल्याचे सिद्ध होते. निसर्गाचा वरदहस्त असूनही केवळ चुकीच्या नियोजनामुळे शहराच्या विकासाचा पुरता विचका करण्यात आला आहे.
हीच बिकट परिस्थिती गजानन महाराज मंदिर परिसर, पॉवर हाऊस आणि शहरातील इतर प्रमुख भागांमध्येही पाहायला मिळत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या रस्त्यांचे पातळीकरण योग्य रीतीने न केल्यामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी तळी साचली आहेत. पाण्यामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघातांची मालिका सुरू झाली आहे. नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा हा परवाना प्रशासनाने ठेकेदारांना दिला आहे का, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
विरोधकांवर टीका करण्यात मग्न असलेल्या सत्ताधाऱ्यांना आणि वातानुकूलित दालनात बसून कागदावर नालेसफाईचे आकडे फुगवणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना जनतेच्या या त्रासाशी काहीही देणेघेणे उरलेले नाही, अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. शहरातील रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असून, जनतेच्या कररूपाने जमा झालेल्या पैशांची ही निव्वळ लूट आहे.
पावसाळ्यापूर्वी नालेसफाई झाल्याचा दावा प्रत्यक्ष परिस्थितीत पूर्णपणे फोल ठरला आहे. तुंबलेली गटारे, रस्त्यांवर साचणारे पाणी आणि नियोजनशून्य विकासकामे यामुळे रत्नागिरीकरांचा जाहीर छळ होत आहे. हीच का ती स्मार्ट सिटीच्या दिशेने होत असलेली वाटचाल? असा खोचक प्रश्न आता रत्नागिरीतील जनता सत्ताधाऱ्यांना विचारत आहे. प्रशासनाने आतातरी आपली अडेलतट्टू भूमिका सोडावी आणि या समस्येवर तातडीने व कायमस्वरूपी तोडगा काढावा, अन्यथा जनतेचा हा संताप रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शहरवासीयांनी दिला आहे.
