भाडेवाढ तेवढी हवी, मात्र बस गळकी असली तरी चालेल, प्रवाशांचा संतप्त सवाल
रत्नागिरी : एका बाजूला तिकीट दरवाढ आणि दुसऱ्या बाजूला परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) बसेसची दयनीय अवस्था, यामुळे प्रवाशांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. रत्नागिरीतून सुटणाऱ्या जांभारी बसमध्ये प्रवाशांना नुकताच असाच एक भयावह अनुभव आला, ज्यामुळे एस.टी.च्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी रत्नागिरीहून जांभारीकडे निघालेल्या बसमध्ये अक्षरशः संपूर्ण गाडीला गळती लागली होती. पावसाचे पाणी आत येत असल्याने प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला. या प्रकारामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, अनेक इतर एस.टी. बसेसचीही अशीच दुरवस्था असल्याचे समोर आले आहे.
प्रवाशांनी तिकीट दरवाढ शांतपणे स्वीकारली असली, तरी किमान चांगल्या सेवेची अपेक्षा व्यक्त केली आहे. “आम्ही वाढीव तिकीट दर देण्यास तयार आहोत, पण त्या बदल्यात किमान सुरक्षित आणि चांगल्या सुविधा मिळायला हव्यात,” अशी भावना एका प्रवाशाने व्यक्त केली. गळक्या छतामुळे प्रवाशांचे सामान भिजले, तर काही ठिकाणी पाणी थेट अंगावर पडत असल्याने प्रवाशांना छत्र्या उघडून प्रवास करण्याची वेळ आली.
एस.टी. महामंडळाच्या ताफ्यातील अनेक बसेस कालबाह्य झाल्या असून त्यांची नियमित दुरुस्ती होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे रस्त्यांवर धावणाऱ्या अनेक बसेस धोकादायक बनल्या आहेत. या गंभीर बाबीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी एस.टी. महामंडळाने तातडीने बसेसची दुरुस्ती करावी आणि नवीन बसेस ताफ्यात आणाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अन्यथा, प्रवाशांचा असंतोष आणखी वाढण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी : जांभारी बसची दयनीय अवस्था, गळक्या बसमधून प्रवास करण्याची वेळ

Leave a Comment