GRAMIN SEARCH BANNER

प्रेमसंबंधातून जन्मलेल्या नवजात बाळाच्या हत्येप्रकरणी मातेची सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता

Gramin Varta
410 Views

रत्नागिरी : तालुक्यातील वरवडे (भंडारवाडी) येथे प्रेमसंबंधातून जन्मलेल्या नवजात बाळाच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेल्या मातेची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सुचिता अजित पटेकर (वय ४५, रा. वरवडे भंडारवाडी) असे या महिलेचे नाव आहे.

या प्रकरणी २२ डिसेंबर २०१९ रोजी जयगड पोलीस ठाण्यात सुचिता पटेकर हिच्याविरुद्ध स्वतःच्या नवजात बाळाच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.

पोलिस तपासानुसार, २२ डिसेंबर २०१९ रोजी वरवडे भंडारवाडी येथील खाडीच्या खाजणात स्त्री जातीचे नवजात अर्भक मृतावस्थेत आढळून आले होते. तपासादरम्यान हे अर्भक सुचिता पटेकर हिचेच असल्याचे निष्पन्न झाले. सुचिता ही विवाहित असून ती गेल्या अनेक वर्षांपासून पतीपासून वेगळी राहत होती. तिचे गावातील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते आणि त्यातून ती गर्भवती राहिली होती.

आपले विवाहबाह्य संबंध उघडकीस येतील, या भीतीपोटी तिने पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवून नवजात बाळाचा खून केला आणि त्यानंतर बाळाचा मृतदेह खाडीच्या खाजणात टाकून दिल्याचा आरोप पोलिसांनी केला होता. या घटनेमुळे जयगड दशक्रोशी परिसरात आणि तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती.

या प्रकरणी जयगड पोलिसांनी सुचिता पटेकर हिच्याविरुद्ध भादंवि कलम ३०२, २०१, ३१५ व ३१८ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मागील पाच वर्षांपासून कारागृहात असलेल्या सुचिताला एप्रिल २०२५ मध्ये न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. अखेर सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी तिची निर्दोष मुक्तता केली आहे

Total Visitor Counter

3366980
Share This Article