GRAMIN SEARCH BANNER

राजापुरात चोरट्यांचा धुमाकूळ; चार घरे फोडली

Gramin Varta
337 Views

दुचाकीसह रोकड लंपास

रत्नागिरी: राजापूर तालुक्यातील कुंभवडे आणि नाणार परिसरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत चार ठिकाणी घरफोडी केली असून, यात रोख रक्कम आणि मोटारसायकलसह ५०,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना १३ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर २०२५ च्या दरम्यान घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी ८.०० वाजेपर्यंतच्या काळात अज्ञात चोरट्यांनी कुंभवडे व नाणार येथे चोरीच्या 4 घटना घडवून आणल्या. कुंभवडे येथील सुहास भगवान मणचेकर (वय ५६) यांच्या तक्रारीवरून राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मणचेकर तसेच साक्षीदार वैशाली हिरेश मयेकर आणि श्री प्रकाश शांताराम वरक यांच्या बंद घरांचे कडीकोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि सामानाची नासधूस केली.

या चोरीच्या मालिकेत नाणार येथील गणपत बाबु वरक यांच्या घरातून चोरट्यांनी रोख ४०,००० रुपये चोरून नेले. याव्यतिरिक्त, फिर्यादी सुहास मणचेकर यांच्या कुंभवडे डुक्करमळी येथील शेतघराचा कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश करत घरातील सामानाची नासधूस करण्यात आली. शोकेस कपाटावर ठेवलेली मोटारसायकलची चावी घेऊन, घराच्या अंगणात असलेली १०,००० रुपये किमतीची एम.एच ०४/ ए.झेड/ १२०४ क्रमांकाची हिरो होंडा कंपनीची काळ्या रंगाची पॅशन मोटारसायकल चोरट्यांनी लंपास केली.

एकूण ५०,००० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी १४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३.२९ वाजता गुन्हा दाखल केला असून, भारतीय दंड संहितेच्या ३०५(ब), ३२४(४), ३३१(२) कलमांखाली एम.आर. क्र. ७७/२०२५ नुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला असून, चोरीच्या या वाढत्या घटनांमुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत. चोरट्यांचा तात्काळ छडा लावावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Total Visitor Counter

2645210
Share This Article