GRAMIN SEARCH BANNER

लांजातील माचाळ येथे पालू ग्रुप ग्रामपंचायतीच्यावतीने तपासणी नाक्याची सुरुवात

Gramin Varta
11 Views

लांजा : तालुक्यातील पर्यटनस्थळ माचाळ येथे पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता पालू ग्रुप ग्रामपंचायती च्यावतीने माचाळच्या प्रवेशद्वारी तपासणी नाक्याची अधिकृत सुरुवात करण्यात आली आहे. रविवार ३ ऑगस्टपासून सुरूवात करण्यात आलेल्या या तपासणी नाक्यामध्ये पर्यटकाकडून प्रवेशासाठी सामान्य स्वच्छता कर प्रतीव्यक्ती १० रुपये शुल्क आकारण्यात येत असून यामुळे ग्रामपंचायतीला महसूलही मिळणार आहे.

या तपासणी नाक्याच्या माध्यमातून अतिउत्साही, मद्यधुंद व हुल्लडबाज पर्यटकांवर अंकुश ठेवण्याचा ग्रामपंचायतीचा उद्देश आहे. अलीकडच्या काळात माचाळ येथे पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढत असून पावसाळी सहलीसाठी दररोज मोठ्या प्रमाणावर पर्यटक येथे दाखल होत आहेत.

त्यामुळे काही वेळा मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्या पर्यटकांमुळे स्थानिक नागरिक व शांततेचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांना त्रास सहन करावा लागत होता. याला आळा बसावा म्हणून लांजा पोलीसांच्यावतीने सलग तीन वेळा हुल्लडबाज पर्यटकांवर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे मद्यधुंद हुल्लडबाज पर्यटकांवर चांगलाच चाप बसल्याचे दिसून आले.

स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने उभारलेला हा तपासणी नाका केवळ अनुशासन टिकवण्यासाठीच नव्हे तर येणाऱ्या पर्यटकांची नोंद ठेवण्यासही उपयुक्त ठरणार आहे. भविष्यात येथील पर्यटनाला चालना मिळावी, स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी ग्रामपंचायतीचा हा स्तुत्य उपक्रम ठरणार आहे.

तपासणी नाक्याच्या उद्घाटनप्रसंगी उपसरपंच सागर गाडे, माचाळचे गावकार पांडुरंग पाटील, तुकाराम पाटील, ग्रामपंचायत अधिकारी महेश घेवदे, पोलीस पाटील विष्णू पाटील, गणेश खाके, शाहनवाज सारंग, फारूख सारंग यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपसरपंच गाडे यांनी माचाळच्या पर्यटकांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि अनुशासित वातावरण निर्माण करण्याचा ग्रामपंचायतीचा निर्धार व्यक्त केला.

माचाळच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरू असून, स्थानिकांनीही घरगुती स्वरूपात जेवण, नाश्त्याची व्यवस्था सुरू केल्याने पर्यटक समाधानी आहेत. भविष्यात हॉटेल्स, दुकाने अशा सुविधांचा विकास होऊन माचाळ गावाचे पर्यटन नकाशावर ठळकपणे नाव कोरण्याची शक्यता ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

3072966
Share This Article