वैभववाडी : करूळ घाटातील संभाव्य दरडी कोसळण्याचा धोका विचारात घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तरेळे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दिनांक 12 सप्टेंबर 2025 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत.यादरम्यान या मार्गांवरील वाहतूक भुईबावडा व फोंडा घाटातून सुरु राहणार आहे.
गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास करूळ घाटात मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यामुळे गुरुवारी सकाळपासूनच तयारी कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कोसळली दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर करीत आहे. हे काम शुक्रवारी दुपारपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र करळ घाटात यापूर्वी सुद्धा विविध ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या असून काही ठिकाणी दरडीना तडे गेलेले दिसून येत आहेत. यासाठी खडकांचे सैलकरण करणे आवश्यक आहे. सदर कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून तज्ञ अभियंत्यांची टीम बोलवण्यात आली आहे. हे काम केल्यास भविष्यात होणाऱ्या दरड कोसळण्याच्या घटना पासून बचाव होऊन वाहतूक सुरळीत राहू शकते. सदर कामासाठी आठ दिवसाचा कालावधी अपेक्षित आहे. नागरिकांच्या सुरक्षेतेच्या दृष्टिकोनातून तसेच आपत्ती व्यवस्थापन दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग 166 जी तरेळे कोल्हापूर महामार्ग हा दिनांक 12 सप्टेंबर 2025 पर्यंत वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. यादरम्यान खारेपाटण गगनबावडा राज्यमार्ग क्रमांक 171 भुईबावडा घाट मार्गे व देवगड निपाणी राज्यमार्ग क्रमांक 178 फोंडा घाट मार्गे वाहतूक सुरू राहणार आहे.
याबाबत कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला नागरिकांच्या व वाहनचालकांच्या सोयीसाठी दिशादर्शक फलक व वाहतूक संकेत चिन्हे लोकांना समजेल अशा भाषेत लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.असे अप्पर जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 12 सप्टेंबरपर्यंत करुळ घाट राहणार वाहतूकीसाठी बंद
