रत्नागिरी : शालेय विद्यार्थ्यांना प्रवासी पास काढण्यासाठी बसस्थानकात जाण्याची गरज नाही तर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य परिवहन महामंडळातर्फे ‘बुडणार नाही तास, शाळेतच मिळेल पास’ उपक्रम सुरू केला आहे. पासची सुविधा थेट शाळा-महाविद्यालयातच उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवारी (दि. १६) शाळा सुरू झाल्या असून, त्या दिवसापासून शाळेत एसटी कर्मचारी. उपस्थित राहत आहेत. यामुळे गेल्या पाच दिवसांत रत्नागिरी विभागांतर्गत विद्यार्थ्यांना दहा हजारपेक्षा अधिक पासचे वितरण करण्यात आले आहे.
एसटीकडून विद्यार्थ्यांना प्रवास भाड्यात ६६.६६ टक्के सवलत दिली जाते. म्हणजेच विद्यार्थ्यांना केवळ ३३.३३ टक्के शुल्क भरून मासिक पास मिळतो. तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना एसटी पास मोफत दिला जातो. विद्यार्थी सवलतीच्या ४,६७८ पास तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ५,८७९ पासचे वितरण करण्यात आले आहे.
यापूर्वी प्रवासी पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांना तास बुडवून बसस्थानकात रांगा लावाव्या लागत असत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असे. शिवाय विद्यार्थी उपाशी असल्यास चक्कर येऊन पडण्याचे प्रकारही होत असत. परिवहन महामंडळातर्फे ‘बुडणार नाही तास, शाळेतच मिळेल पास’ उपक्रम राबविण्यास प्रारंभकेला आहे. विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी शाळेतच विद्यार्थी पास वितरण केले जात आहेत. त्यासाठी मुख्याध्यापकांना विद्यार्थी यादीच देण्याची सूचना करण्यात आली आहे.
रत्नागिरीत पाच दिवसांत तब्बल 10 हजार विद्यार्थ्यांना पासचे वितरण

Leave a Comment