GRAMIN SEARCH BANNER

लांजात विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त

लांजा: ग्राहकांकडून वीजबिल वसुलीसाठी नेहमी अग्रेसर असणाऱ्या महावितरण विभागाला वीजपुरवठा पुरवठा सुरळीत ठेवणे मात्र अवघड जात असून लांजा शहरासह तालुक्यात विजेच्या सततच्या लपंडावाने जनता त्रस्त झाली झाली आहे. याचा परिणाम विद्यार्थी, व्यापारी, शासकीय कार्यालये, खासगी आस्थापना, पाणीपुरवठा आणि इलेक्ट्रॉनिक उपरणे या सर्वांवर होत असून याबाबत महावितरण विभागाच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे.

लांजा महावितरण विभागाकडून मान्सून पूर्व कामे झाल्याचा दावा केला जातो. परंतु या दाव्याचा फज्जा उडाताना दिसून येतो. लांजात वीजपुरवठा सतत खंडित होत असून महावितरणने मान्सूनपूर्व तयारीमध्ये योग्य ती काळजी न घेतल्यामुळेच वीजपुरवठा खंडित होऊन विविध समस्यांना तोंड द्यावे लागते.

वीजबिलासाठी तगादा लावणाऱ्या महावितरण विभागाकडून नागरिकांना सोयी देताना मात्र तत्परता दाखवली जात नाही. लांजा शहरासह तालुक्यात दिवसरात्र विजेच्या लपंडाव सुरू असतो. याचा मोठा फटका व्यापारी वर्गाला बसतो, तसेच वीजपुरवठा सतत खंडित झाल्याने नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणी येत असतात. विजेच्या सततच्या येण्याजाण्याच्या खेळामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणे बिघडण्याचे प्रमाण वाढले असून सर्वसामान्य जनतेला यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.

पाऊस सुरू असताना काही नैसर्गिक आपत्तीमुळे विजपुरवठा खंडीत होतो. परंतु पाऊस नसताना सतत विजपुरवठा खंडीत होत असल्याने याबाबत महावितरण कार्यालयात विचारणा केल्यास समाधानकारक उत्तर मिळत नाहीत. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्याचे प्रकार देखील तालुक्यात काही ठिकाणी घडले आहेत. त्यामुळे चार-चार दिवस अंधारात राहण्याची वेळ संबंधित नागरिकांवर आली.

लांजा शहरासह तालुक्यात दिवसरात्र वीजपुरवठा खंडीत होत असतो. महावितरण विभागाने मान्सूनपूर्व कामे पूर्ण झाल्याचे केलेल्या दाव्याचा फज्जा उडाला असून सद्यस्थितीत सुरू असलेला महावितरणचा भोंगळ कारभार पाहून पावसाळा नुकताच सुरू झालेला असताना अशी परिस्थिती असेल तर संपूर्ण पावसाळ्यात काय परिस्थिती होईल हे सांगता येत नाही.

नुकतेच शैक्षणिक वर्षे सुरू झाले आहे. शैक्षणिक वर्षात विविध दाखल्यांसाठी तहसीलदार कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्याचप्रमाणे शासकीय कार्यलयातील कामे देखील विजेवर अवलंबून असतात. परंतु सतत वीजपुरवठा खंडीत होत असल्याने होणारी कामे तासंतास रखडलेली असतात. त्यामुळे नागरिकांना ताटकळत रहावे लागते.

वीजपुरवठा सतत खंडीत होत असल्याने विद्यार्थी, व्यापारी, शासकीय कार्यालये, खासगी आस्थापना, पाणी पुरवठा करणारी यंत्रणा आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे या सर्वांना त्याचा फटका बसतो. तसेच वारंवार खंडीत होणाऱ्या विजपुरवठ्यामुळे वीजबिलांवर कोणतीही सुट दिली जात नाही. परंतु, वीजबिल भरुन घेताना मात्र हयगय केली जात नाही. त्यामुळे महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे तालुक्यातील जनता जेरीस आलेली आहे.

Total Visitor Counter

2475327
Share This Article