चिपळूण : भरधाव वेगातील दुचाकीने टेम्पोला धडक दिल्याची घटना मंगळवारी खांडोत्री येथे घडली. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उदय शैलेश पटेल (राहणार गुहागर) असे गुन्हा दाखल झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबतची फिर्याद औदुत सोमा भागडे (वय ३१, रा. आंबिटगाव) यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औदुत भागडे हे त्यांच्या ताब्यातील टेम्पो पाते पिलवली येथून आंबिटगावकडे चालवत होते. दरम्यान, खांडोत्री येथील गांगण यांच्या पोल्ट्रीजवळील वळणावर आल्यानंतर समोरून येणाऱ्या दुचाकीवरील चालक उदय पटेल याने रस्ता वळणाचा असतानाही भरधाव वेगाने दुचाकी चालवत चुकीच्या दिशेने उजव्या बाजूस येत टेम्पोला धडक दिली.
या अपघातात उदय पटेल हा जखमी झाला आहे. या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
चिपळूण : खांडोत्री येथे भरधाव दुचाकीची टेम्पोला धडक; दुचाकीस्वार जखमी





