GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग: दसपटीला जोडणारा पिंपळी नदीवरील पूल खचला, वाहतूक ठप्प

Gramin Varta
35 Views

चिपळूण: चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागाला जोडणारा महत्त्वाचा मार्ग ठप्प झाला आहे. पिंपळी – नांदिवसे रस्त्यावरील पिंपळी नदीवरील पूल अचानक खचल्याने दसपटीकडे जाणारी सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे. तब्बल १९६५ साली बांधलेला हा पूल जुना झाल्यामुळे खचला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या पुलाच्या काही भागांना तडे गेल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, उपअभियंता अरुण मुळजकर, ज्युनिअर इंजिनिअर महेश वाजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुलाची पाहणी केल्यानंतर कोणताही मोठा अपघात टाळण्यासाठी त्यांनी तात्काळ पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतला.

दसपटी विभागाकडे जाणारे प्रवासी आणि वाहनचालक यांना आता पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पिंपळी – पेढाबे फाटा – खडपोली या मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

या घटनेमुळे दसपटी विभागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यावेळी राजू मेस्त्री, संदेश मोहिते (खेर्डी), विलास मोहिते, मुराद अडरेकर, फिरोज कडवइकर (सरपंच, खडपोली) यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. हा पूल पिंपळी गाणे आणि खडपोली एम.आय.डी.सी.ला जोडणारा असल्यामुळे वाहतूक बंद झाल्याने मोठे गैरसोय होत आहे.

Total Visitor Counter

3369876
Share This Article