खेड (विशेष वार्ताहर) प्रवाशांची प्रचंड वाढती गर्दी, सातत्याने फुल्ल होणारे आरक्षण आणि मुंबई-कोकण-गोवा या पट्ट्यातील दिवसेंदिवस वाढते महत्त्व असतानाही मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस अजूनही केवळ आठ डब्यांवरच चालवली जात असल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. कमी प्रतिसाद असलेल्या इतर मार्गांवर २० डब्यांचे रेक दिले जात असताना सर्वाधिक भार असलेल्या मुंबई-मडगाव मार्गावर मात्र दुर्लक्ष केले जात असून, यावरून कोकण विकास समितीने रेल्वे प्रशासनाच्या प्राधान्यक्रमावर आणि कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गाडी क्रमांक २२२२९/२२२३० मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसची प्रवासी क्षमता तातडीने वाढवून तिला २० डब्यांचा रेक द्यावा, असा थेट सवाल आणि मागणी समितीचे जयवंत शंकर दरेकर यांनी रेल्वे बोर्ड, मध्य रेल्वे तसेच कोकण रेल्वे प्रशासनाकडे एका पत्राद्वारे केली आहे.
मुंबई, कोकण आणि गोवा यांच्यातील प्रवासासाठी ही जलद सेवा अत्यंत महत्त्वाची ठरत असताना अपुऱ्या आसनक्षमतेमुळे आरक्षणासाठी प्रवाशांची मोठी धावपळ उडत असून आठ डब्यांची मर्यादा प्रवाशांची डोकेदुखी ठरत आहे. प्रशासनाला प्रवाशांची ही तुफान गर्दी दिसत नाही का, की क्षमतावाढीसाठी आणखी किती वर्षे प्रतीक्षा करावी लागणार, असा रोखठोक जाब आता विचारला जात आहे. जर प्रवासी भार आणि मागणी हाच क्षमतावाढीचा निकष असेल तर सर्वप्रथम या मार्गाला २० डब्यांचा रेक मिळायला हवा होता, अशी ठाम भूमिका समितीने घेतली आहे.
मुंबई-मडगाव वंदे भारत ही केवळ पर्यटनासाठी मर्यादित नसून कोकणातील नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी आणि वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईकडे धाव घेणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांसाठीही तितकीच आधारवड आहे. त्यामुळे या गाडीची डबेसंख्या वाढवणे ही केवळ रेल्वेची सुविधा नसून कोकणाच्या विकासाशी जोडलेली अत्यावश्यक बाब आहे. यासंदर्भात वारंवार निवेदने देऊनही ठोस निर्णय होत नसल्याने प्रवाशांच्या मागण्या रेल्वे प्रशासनाच्या कानावर पडत नाहीत का, असा संतप्त सवाल आता कोकणवासीयांतून उपस्थित केला जात आहे.






