खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट परिसरात अज्ञात चोरट्यांनी थेट मोबाईल टॉवरवरील दीड लाखांचे महागडे इलेक्ट्रॉनिक साहित्य लंपास केले. हा प्रकार दिवसा ढवळ्या घडल्याने पोलिसांच्या गस्त व दक्षतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11.54 वाजण्यापूर्वी एअरटेलच्या टॉवर परिसरात घुसलेल्या चोरट्यांनी धारदार हत्याराने गेट व फायबर कॅबिनेटचे कुलूप तोडले. त्यानंतर आतील दोन महागडे ‘सिसको पेयटो एसटीएफ कार्डस्’ चोरून नेले. या कार्ड्सची किंमत तब्बल दीड लाख रुपये इतकी असल्याचे तक्रारदार सुहास दत्ताराम गवाणे (रा. गवळीवाडी, लांजा) यांनी खेड पोलिस ठाण्यात नमूद केले आहे.
मोठ्या रकमेचे साहित्य चोरून नेले गेले, तरी महामार्गावरील संवेदनशील भागात पोलिसांना या हालचालींचा पत्ताच लागला नाही. दिवसा झालेल्या या चोरीमुळे गुन्हेगारांचे मनोबल किती वाढले आहे, याचे स्पष्ट चित्र समोर आले आहे.
स्थानिक नागरिकांनी यानंतर संताप व्यक्त करत पोलिसांनी केवळ गुन्हा दाखल करून थांबू नये, तर अशा प्रकारच्या गंभीर चोरींचा पर्दाफाश करून आरोपींना अटक करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
परशुराम घाटात दिवसाढवळ्या मोबाईल टॉवरवरील दीड लाखांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य लंपास
