संगमेश्वर : तालुक्यातील देवरूख शहरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. अवघी आठ वर्षांची निष्पाप तीर्था दिनेश दामुष्टे या चिमुरडीचा अचानक ताप आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तिच्या अकाली जाण्याने दामुष्टे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण देवरूख शहर शोकसागरात बुडाले आहे.
देवरूख येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ४ मध्ये दुसरीच्या वर्गात शिकणारी तीर्था, अभ्यासात हुशार, वागण्यात गोड आणि सर्वांची लाडकी होती. तिचे गोंडस हसू आणि शाळेच्या पटांगणात मनसोक्त खेळण्याची तिची निरागस प्रतिमा आज केवळ आठवणींच्या रूपात मागे राहिली आहे. ‘आई’च्या कुशीत अलगद विसावणारी ती नाजूक कळी नियतीच्या क्रूर घाताने क्षणात कोमेजून गेली.
मिळालेल्या माहितीनुसार, तीर्थाला अचानक ताप आल्याने तिला देवरूखमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा न झाल्याने, तिला तातडीने कोल्हापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे सर्वतोपरी उपचार सुरू असतानाही, काळाने या उमलत्या कळीचे आयुष्य संपवले.
तीर्थाच्या निधनाने तिचे आई-वडील आणि कुटुंबीयांचे डोळे अश्रूंनी डबडबले आहेत. हे दुःख शब्दांत व्यक्त करण्यासारखे नाही. तीर्था जरी आज आपल्यात नसली तरी, तिचे निरागस हास्य आणि तिचे नाव गावकऱ्यांच्या काळजात कायमचे कोरले गेले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.