संगमेश्वर: संगमेश्वर तालुक्यातील रामपेठ येथे एक दुर्देवी घटना घडली आहे. मराठी शाळेजवळ गेली तीनशे वर्षे उभा असलेला एक विशाल पिंपळवृक्ष वादळी वाऱ्यामुळे मध्यरात्री कोसळला. पहाटे ४ ते ४:३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेत सुमारे ५ लाख रुपयांचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या दुर्घटनेचा सर्वाधिक फटका श्री. उदय संसारे, संजय संसारे आणि मिलिंद संसारे यांच्या कुटुंबीयांना बसला आहे. त्यांच्या घरांच्या मागील बाजूस हा प्राचीन पिंपळवृक्ष कोसळल्याने घरांचे मोठे नुकसान झाले आहे. केवळ घरांचेच नव्हे, तर परिसरातील पोपळी, नारळ आणि इतर फळझाडेही या वृक्षाच्या तडाख्याने जमीनदोस्त झाली आहेत. या फळझाडांपासून संसारे कुटुंबीयांना नियमित आर्थिक उत्पन्न मिळत असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
संसारे कुटुंबीयांनी या घटनेची माहिती तात्काळ शासकीय यंत्रणेला दिली असून, नुकसानीचा पंचनामा करून आर्थिक मदतीची मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाकडे त्वरीत लक्ष देऊन पीडित कुटुंबांना योग्य ती मदत देण्याची मागणी केली आहे.