उत्कृष्ट रस्ते हे शहर विकासाचे प्रतीक,वाढत्या देवरुख व साडवली शहरात रस्ते सुधारणांना प्राधान्य देणे आवश्यक – भोपळकर
देवरुख (प्रतिनिधी): देवरुख आणि साडवली भागातील मुख्य रस्त्यांची खड्ड्यांमुळे झालेली दुरवस्था पाहता, या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची जोरदार मागणी गाव विकास समितीने केली आहे. उत्कृष्ट रस्ते हे शहर विकासाचे प्रतीक असून, वाढत्या देवरुख व साडवली शहरात रस्ते सुधारणांना प्राधान्य देणे आवश्यक आहे, असे मत गाव विकास समितीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर यांनी व्यक्त केले आहे.
खड्ड्यांमुळे नागरिक आणि वाहनचालकांना प्रचंड त्रास:
शहरातील मुख्य रहदारीच्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिक आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः पंचायत समिती कार्यालयासमोरचा रस्ता आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सह्याद्री नगर दरम्यानच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि देवरुख नगरपंचायत हद्दीतील या प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे.
नगरपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला आवाहन:
गाव विकास समितीने संबंधित विभागांना या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.
- देवरुख नगरपंचायतने आपल्या हद्दीतील रस्ते दुरुस्ती कडे लक्ष दिले पाहिजे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या हद्दीतील मुख्य रहदारीचे रस्ते वेळेत दुरुस्त करावेत.
- नगरपंचायत हद्दीतील जे रस्ते विविध यंत्रणांच्या ताब्यात आहेत, त्या यंत्रणांशी नगरपंचायतीने तातडीने संपर्क साधून रस्त्यांची दुरुस्ती करून घ्यावी.
- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या रस्त्यांची त्या विभागाने वेळेत दुरुस्ती करावी.
नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या या गंभीर समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन, नागरिकांना खड्डेमुक्त रस्त्यांचा हक्क मिळवून द्यावा, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
“नियोजनबद्ध व उत्कृष्ट रस्ते हे शहर विकासाचे प्रतीक असून, वाढत्या देवरुख व साडवली शहरात रस्ते सुधारणांना प्राधान्य देणे आवश्यक आहे, सध्या रस्त्यांची परिस्थिती पाहिली तर अशा रस्त्यांमुळे शहराच्या विकासात अडथळा येतो याबाबत कुणाचेही दुमत असणार नाही. प्रशासनाने वेळीच याबाबत ठोस उपाययोजना कराव्यात व आपल्या भागातील रस्ते खड्डे मुक्त करून दर्जेदार बनवावेत “ – श्यामकर्ण भोपळकर,रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष,गाव विकास समिती