GRAMIN SEARCH BANNER

कोकण सुपुत्र मोहन कदम यांना ‘कोकण रत्न पदवी’ जाहीर!

Gramin Varta
78 Views

मुंबई/शांताराम गुडेकर: सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रात रत्नागिरी जिल्ह्याचा गौरव वाढवणारे कोकण सुपुत्र मोहन जयराम कदम यांची ‘कोकण रत्न पदवी’साठी निवड झाल्याची अधिकृत घोषणा स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक संजय कोकरे यांनी केली आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील गरजू व्यक्ती, विद्यार्थी, रुग्ण, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक यांना सातत्याने मदतीचा हात देत वैद्यकीय उपचारांसाठी सहकार्य करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कासार कोळवण गावचे सुपुत्र म्हणून मोहन कदम यांचे कार्य लक्षणीय आहे.

स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव म्हणून दरवर्षी हा मानाचा ‘कोकण रत्न पदवी’ पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यावर्षी समाजसेवेचा वसा निष्ठेने जपणारे आणि निःस्वार्थपणे कार्यरत असणारे मोहन कदम यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

हा बहुमान प्रदान करण्याचा सोहळा शनिवार, दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत मुंबई मराठी पत्रकार भवन, आझाद मैदान शेजारी, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. हा समारंभ संस्थेचे संस्थापक संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल. या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक सचिन कळझुनकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच संस्थेचे मुंबई अध्यक्ष धनंजय कुवेसकर, खजिनदार राजेंद्र सुर्वे, नेते सुभाष राणे आणि सल्लागार दिलीप लाड यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे.

शिवशक्ती उत्कर्ष मंडळाचे माजी पदाधिकारी तसेच महान समाजकार्याचा वसा घेऊन आयुष्यभर गावात राहून समाजकार्य करणारे मोहन कदम हे आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवत आहेत. त्यांना मिळालेली ही पोचपावती म्हणून आतापर्यंत त्यांना अनेक महत्त्वाचे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. समाजात कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता, निःस्वार्थी वृत्तीने सर्वांना सोबत घेऊन जाणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. ‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा’ असा लौकिक असलेले पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. मोहन जयराम कदम यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
श्री. मोहन जयराम कदम हे एक अष्टपैलू, व्यासंगी सामाजिक कार्यकर्ता आणि निस्पृह, सजग पत्रकार असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. महाराष्ट्रातील विविध संस्था, मंडळ आणि प्रतिष्ठानमध्ये ते कार्यरत आहेत. त्यांनी समाजप्रबोधन करत समाजातील अनावश्यक आणि अनिष्ठ प्रथा बंद करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे, ज्यामुळे लोकांचा वेळ आणि पैसा वाचण्यास मदत झाली आहे. लोकांना शक्य तेवढी मदत करण्याची आणि गरजेला घरच्या माणसाप्रमाणे धावून जाण्याची त्यांची ओळख आहे. त्यांना या कार्यात त्यांची पत्नी, मुले, भाऊ आणि मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभते. घरातून मिळालेले समाजसेवेचे बाळकडू आणि पत्नी-मुलांचे प्रेम या जोरावर ते यशस्वी झाले आहेत.

दरम्यान, मोहन कदम यांना ‘कोकण रत्न पदवी’ जाहीर झाल्याबद्दल हरी ओम रेल्वे प्रवाशी भजन मंडळाचे सल्लागार महेंद्र करंबे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की, गेली अनेक वर्षे निःस्वार्थ सेवा देणारे, समाजकार्य आणि पत्रकारितेत सक्रिय राहून समाजाला दिशा देणारे मोहन कदम यांना हा प्रतिष्ठित पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे, ही संपूर्ण कोकणासाठी अभिमानाची बाब आहे. पत्रकारितेतून अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, सामाजिक कार्यातून दुर्बल घटकांना आधार देणे, आणि धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यातून एकात्मतेचा संदेश देणे हे त्यांच्या जीवनाचे ध्येय बनले आहे. त्यांना मिळालेला हा ४७ वा पुरस्कार त्यांच्या सततच्या परिश्रमांचे फलित आहे.

मोहन कदम यांनी या निवडीबद्दल बोलताना, “जनसेवा हीच ईश्वर सेवा असे समजून मी सतत काम करत असतो. लोकांचे आशीर्वाद हेच आमच्यासाठी पुरस्कार आहेत,” असे मत व्यक्त केले. तसेच स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक संजय कोकरे, सर्व पदाधिकारी, सदस्य आणि निवड समिती यांचे त्यांनी मनापासून आभार मानले. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील कासार कोळवण गावचे सुपुत्र मोहन कदम यांना “कोकण रत्न पदवी” जाहीर झाल्याबद्दल साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर, पत्रकार, वृत्तपत्र लेखक, ग्रामीण मंडळ आणि विविध संस्था-प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांसह अनेकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Total Visitor Counter

3199426
Share This Article