चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर असुर्डे ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या अपघातात दोन ट्रक वाहनांचे तसेच मालाचे मोठे नुकसान झाले असून, याप्रकरणी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात ५ मे २०२६ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास जयळ उतारामध्ये घडला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अशोक हनमंत पवार (वय ४८, रा. मालाड ईस्ट, मुंबई) हे आपल्या मालकीची अशोक लेलँड कंपनीची एल.पी. ट्रक क्रमांक एमएच ०७ एजे ०९९९ ही गाडी घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होते. त्यावेळी असुर्डे ग्रामपंचायतजवळील जयळ उतारामध्ये मागून येणाऱ्या अशोक लेलँड कंटेनर ट्रक क्रमांक पीबी १३ बीपी ४७३६ वरील चालक कलदिप सिंह पवार (वय ४५, रा. गोटका, ता. सरदना, जि. मेरठ, उत्तरप्रदेश) याने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात व बेदरकारपणे चालवत पुढील ट्रकला जोरदार धडक दिली.
या धडकेत दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, फिर्यादी यांच्या ट्रकमधील मालाचेही नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. अपघातानंतर चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१ तसेच मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
चिपळूण : असुर्डे येथे कंटेनर-ट्रकची धडक; दोन वाहनांचे मोठे नुकसान






