संगमेश्वर : तालुक्यातील खाडी विभागात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय नांगरणी स्पर्धेत गावठी गटात तुरळ येथील अरविंद जाधव यांनी, तर घाटी गटात शाहूवाडी येथील पांडुरंग पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेला शेतकरी आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पारंपरिक शेती संस्कृतीचे जतन, शेतकऱ्यांमध्ये एकोपा निर्माण करणे आणि शेतीविषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत राज्यातील विविध भागांतील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.
गावठी गटात कडवई येथील रेवती प्रदीप उजगावकर यांनी द्वितीय क्रमांक, तर आई भैरीभवानी गटाने तृतीय क्रमांक मिळविला.
घाटी गटात आरवली येथील रुद्र महेंद्र गुरव यांनी द्वितीय क्रमांक, तर देवजी सोनू भायजे यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
स्पर्धेच्या आयोजनासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष थेराडे,जिल्हा परिषद सदस्या विशाखा कुवळेकर, जिल्हा परिषद सदस्य बापू म्हाप, रत्नागिरी सभापती प्रवीण पांचाळ, राजेश मुकादम, विभाग प्रमुख महेश देसाई, सुरेश भायजे यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी श्री. थेराडे म्हणाले, नांगरणी स्पर्धेच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये एकोपा वाढत आहे. शेतकऱ्यांना शेतीविषयक जनजागृती देण्याबरोबरच विविध भागांतील शेतकऱ्यांना एकत्र आणून सामूहिक शेतीला चालना देण्यासाठी अशा स्पर्धांची महत्त्वाची भूमिका आहे. खाडी विभागात स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आलेला हा प्रयोग निश्चितच यशस्वी होईल.
पारंपरिक शेतीच्या पद्धती, बैलजोडी आणि नांगरणीचे कौशल्य अनुभवण्याची संधी या स्पर्धेमुळे मिळाल्याने परिसरातील नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. ग्रामीण भागातील शेती संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
संगमेश्वर: राज्यस्तरीय नांगरणी स्पर्धेत गावठी गटात अरविंद जाधव, घाटी गटात पांडुरंग पाटील प्रथम
Leave a Comment




