दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर वन्यजीवन संवर्धनाचा अनोखा संदेश
चिपळूण | प्रतिनिधी: दसऱ्याच्या मंगलमुहूर्तावर चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये ‘संगीत बिबट आख्यान’ या अनोख्या नाट्यप्रयोगाचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. वनविभाग आणि वन्यवानी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या नाट्यप्रयोगाने प्रेक्षकांची मने जिंकली.
“बिबट्या आपला शत्रू नसून मित्र आहे” हा सकारात्मक संदेश अत्यंत प्रभावी पद्धतीने या नाट्यातून पोहोचवण्यात आला. हसवत-हसवत अंतर्मुख करणाऱ्या या प्रयोगात मानवी आणि वन्यजीवनातील नातेसंबंध प्रभावीपणे उलगडण्यात आले.
या नाट्यप्रयोगाचे लेखन आणि दिग्दर्शन लांजाचे सुपुत्र मकरंद सावंत यांनी केले होते. निर्मिती कुणी का बनसोडे सावंत यांची होती. संगीत दिग्दर्शन अथर्व भेकरे यांचे असून, नृत्यदिग्दर्शन वैष्णवी भालेकर आणि कुणाल पाटील यांनी सांभाळले.
कलाकारांच्या चमूत महेश कापरेकर, मकरंद सावंत, सागर चव्हाण, श्रुती पाटील, सचिन शिंदे, वेदांत जाधव, तुलसी बोले, यश खडे, शिवम किरडवकर, साहिल परब, सुरेश म्हात्रे, योगेश गोंदे यांचा समावेश होता. निर्मिती सूत्रधार म्हणून अक्षय मांडवकर व माधवी देवळेकर यांनी जबाबदारी पार पाडली.
कार्यक्रमाला वनाधिकारी, सह्याद्री निसर्गमित्र, ग्लोबल टुरिझमचे रामशेठ रेडीज, विश्वास पाटील, अजय यादव, भाऊ कार्ले, योगेश बांडागळे, शहानवाज शहा, समीर कोवळे, मंगेश बापट, प्रकाश गांधी, पत्रकार सतीश कामत आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनीच नाट्यप्रयोगाचे भरभरून कौतुक केले.
वनाधिकारी गिरजा देसाई यांनी या नाटकाला राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. “अशा प्रयोगांची गावोगावी सादरीकरणे झाली पाहिजेत,” असा सूर उपस्थितांनी काढला.
चिपळूणमध्ये ‘संगीत बिबट आख्यान’चे दणक्यात रंगतदार सादरीकरण
